मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केलं होतं की, आपले सर्व राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करावेत. पण मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला त्यांच्याच पक्षातील मंत्री संजय राठोड यांनी धुडकावून लावल्याचं आज पाहायला मिळालं आहे.
ADVERTISEMENT
पूजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षाने आरोप सुरु केले होते. जेव्हापासून या प्रकरणाची चर्चा सुरु झाली तेव्हापासून संजय राठोड हे नॉट रिचेबल होते. अखेर आज (23 फेब्रुवारी) ते मीडियासमोर आले आणि त्यांनी आपली बाजू मांडली. पण असं करताना त्यांनी एक एकप्रकारे मोठं राजकीय शक्तीप्रदर्शनच केलं. ज्यावरुन आता त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे.
राज्यात सध्या कोरोनाची स्थिती गंभीर आहे. त्यातही अमरावती, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण अत्यंत झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने येथे अनेक निर्बंध लागू केले आहेत. अशावेळी संजय राठोड यांच्यासारख्या एका बड्या मंत्र्याने ज्या पद्धतीने शक्तीप्रदर्शन केलं त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
1. गेले पंधरा दिवस अज्ञातवासात गेलेल्या संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचं आवाहन का धुडकावलं?
2. कोरोनाची स्थिती गंभीर असताना पोहरागड येथे जाणं एवढं खरंच गरजेचं होतं?
3. संजय राठोड यांनी आपल्या दौऱ्याबाबत गुप्तता का पाळली नाही?
4. या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढल्यास संजय राठोड त्याची जबाबदारी घेणार का?
5. बेजबाबदारपणे पोहरागडचा दौरा करणाऱ्या संजय राठोडांवर सरकार काही कारवाई करणार का?
नवनीत राणा, धनंजय महाडिकांवर कारवाई संजय राठोडांचं काय होणार?
दोनच दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हे विनामास्क बुलेटवरुन शहरात फिरत असल्याचं दिसून आलं होतं. याबाबतंच वृत्त जेव्हा ‘मुंबई तक’ने दाखवलं तेव्हा त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशावेळी संजय राठोड यांनी कोरोनाच्या काळात जो पोहरादेवीचा दौरा केला आणि त्यावेळी जी मोठी गर्दी झाली याला जबाबदार धरुन संजय राठोड यांच्यावर पोलीस काही कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, संजय राठोड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुंबई तकच्या प्रतिनिधींनी याचबाबत जेव्हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा यावर काहीही उत्तर न देता संजय राठोड हे उठून निघून गेले.
ही बातमी देखील पाहा: ‘घाणेरडं राजकारण सुरु, माझं राजकीय जीवन उदध्वस्त करण्याचा प्रयत्न’
मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आवाहन केलं होतं?
‘सर्व राजकीय पक्षांना मी आवाहन करत आहेत की, आता पुढील काही दिवस राजकीय, धार्मिक कार्यक्रम घेणं टाळावं. तसेच शासकीय कार्यक्रम, मिरवणुका, मोर्चे, आंदोलनं यावर देखील बंदी घालण्यात येत आहे.’ असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं.
मुख्यमंत्र्यांनी केलेलं हे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी ज्या पद्धतीने धुडकावून लावलं ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्यावर काही कारवाई केली जाणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच जोवर या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही तोवर ‘मुंबई तक’ त्याचा पाठपुरावा देखील करत राहणार आहे.
ADVERTISEMENT