नागपूरच्या पत्रकार परिषदेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. राज ठाकरे हे नागपूर दौऱ्यावर आहेत. त्यांनी राज्यातला सत्ताबदल तसंच फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जाणं या सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं. तसंच या पत्रकार परिषदेत त्यांनी जो बायडन आणि व्लादिमिर पुतिन यांचाही उल्लेख केला.
ADVERTISEMENT
काय म्हटलं आहे राज ठाकरेंनी?
‘राजकारण हे एका बाजूला असतं. माझे आणि नितीन गडकरींचे संबंध हे १९९१-९२ पासून मैत्रीचे संबंध आहेत. राजकारणात मुद्दे, धोरणांवर टीका होत असते. त्यात वैयक्तिक गोष्टींना काहीही स्थान नसतं. २०१९ मध्ये ‘लाव रे तो व्हिडीओ’ टॅगलाईन होती. त्यात तुम्ही बघितलंत तर त्यात माझा विरोध धोरणांना होता. नरेंद्र मोदी असतील किंवा आणखी कुणी असतील, माझी वैयक्तिक टीका नव्हती. वैयक्तिक टीका करणं हल्ली फारच वाढलंय. हल्ली घरापर्यंत शिरतात. सगळ्या गोष्टींबद्दल. अनेकदा आघाड्यांमध्येही वाद होतात.
महाराष्ट्रात इतकी प्रतारणा पाहण्यास मिळाली नाही
गेल्या दोन वर्षात बघितलं तर इतका गोंधळ, इतकी प्रतारणा महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत कधी बघितलं नाही. कोण कुणाबरोबर जातंय, कोण कुणाबरोबर सत्ता स्थापन करतंय, कोण विरोधी पक्षात बसतंय. अशी गोष्ट मी आतापर्यंतच्या राजकारणात बघितली नाही.
हे वक्तव्य केल्यानंतर राज ठाकरेंना विचारण्यात आलं की तुम्ही हा कुणाकडे इशारा करत आहात? त्यावर राज ठाकरे क्षणाचाही विलंब न करता उत्तरले पुतिन. उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत बोलत होते आणि त्यांनी इथे जे राजकारण घडतं आहे त्याबाबतच हा उल्लेख केला होता.
२०२४ चा तुमचा अजेंडा काय? हे विचारताच दिलं मिश्किल उत्तर
याच पत्रकार परिषदेत राज ठाकरेंना २०२४ च्या दृष्टीने तुमचा अजेंडा काय असा प्रश्न पत्रकारांनी विचारला त्यावर जो बायडन यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे असं उत्तर दिलं. हे उत्तर देताच उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला. राज ठाकरे हे त्यांच्या हजरजबाबीपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचीच प्रचिती आज नागपूरच्या पत्रकार परिषदेतही आली.
वेदांता-फॉक्सकॉन प्रोजेक्ट : फिस्कटलं कुठे आणि कशामुळे?
फॉक्सकॉन प्रोजेक्टबद्दल राज ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केलेय. ‘मी त्या दिवशी निवेदन जारी केलं होतं. त्यात मी मुळात हेच म्हटलं होतं की, हे फिस्कटलं कुठे आणि कशामुळे? याची चौकशी होणं गरजेचं आहे. या सगळ्या उद्योगाकडे काही पैसे मागितले गेले का?’, असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेत.
ADVERTISEMENT