देशभरात १ मे पासून लसीकरणाच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. या वेळी १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लस दिली जाणार आहे. परंतू देशातील अनेक महत्वाच्या राज्यांमध्ये लसीचा तुटवडा असताना फक्त गुजरातला लसीचे सर्वाधिक डोस कसे काय मिळतात असा सवाल काँग्रेसचे खासदार आणि माजी मंत्री जयराम रमेश यांनी विचारला आहे.
ADVERTISEMENT
जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आकडेवारीचा दाखला दिला आहे. २ मे रोजी ११ राज्यात १८ ते ४४ वयोगटात ८६ हजार २३ जणांना कोरोनाची लस मिळाली. यामध्ये गुजरातमध्ये ५१ हजार ६२२ लसीचे डोस देण्यात आले. महाराष्ट्रात १२ हजार ५२५ तर दिल्लीत १ हजार ४७२ डोस देण्यात आले. एकीकडे देशभरात लस मिळत नसताना गुजरातलाच लसीचा सर्वाधिक साठा कसा मिळतो? २ मे रोजी फक्त ११ राज्यांमध्येच लसीकरण का पार पडलं असे प्रश्न जयराम रमेश यांनी विचारले आहेत.
Corona प्रतिबंधक लसींची मोदी सरकारने नवी ऑर्डरच दिली नसल्याचं वृत्त चुकीचं
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये लसीचा तुटवडा जाणवत आहेत. मुंबईसारख्या शहरात अनेक केंद्र लस नसल्यामुळे बंद आहेत. ज्या केंद्रांवर लस मिळत आहे तिकडे लोकं आणि पोलिसांमध्ये हमरीतुमरी होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत फक्त एका राज्याला लसीचे सर्वाधिक डोस कसे मिळतात यावरुन विरोधी पक्षातील काँग्रेस भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. लसीच्या कमी पुरवठ्यावरुन गेल्या काही दिवसांत राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये बरेच वाद रंगल्याचं पहायला मिळालं. अशा परिस्थितीत सर्व राज्यांना लसीचा समान साठा मिळण्याबाबत केंद्र सरकार आता काय पावलं उचलंतय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT