ज्याची वर्षभर वाट पाहिली ती कोरोना लस तर आली, पण घ्यायला कुणी तयार का नाही? हा प्रश्न अनेकांना पडतोयही आणि त्यावरून अनेकांचे लस घेण्याकडचा दृष्टीकोनही बदलतोय. मुंबईतल्या जेजे हॉस्पिटलमध्ये मंगळवारी 100 पैकी फक्त 13 जणांनी लस घेतली. जेजे हे महाराष्ट्रातील त्या 6 हॉस्पिटलपैकी एक आहे, जिथे भारत बायोटेकची कोवॅक्सीन दिली जाते. आता ह्यामागे 3 कारणं असू शकतात….एक तर ही लस कोवॅक्सीन आहे, म्हणून तिथले कर्मचारी घेत नसतील, दुसरं म्हणजे लसीबाबतच एकंदरीत त्यांच्या मनात भीती किंवा शंका असतील, किंवा तिसरं म्हणजे काही तांत्रिक बिघाडही असू शकतो. लसीकरणाच्या दुसऱ्याच दिवशी कोविन अपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या. फक्त जे.जेच नाही तर भारत बायोटेकची कोवॅक्सीन देण्यात येणाऱ्या उर्वरित 5 ठिकाणीही काहीशी अशीच परिस्थिती आहे.
ADVERTISEMENT
औरंगाबादच्या गर्व्हमेंट मेडिकल कॉलेजमध्येही केवळ 14 जण आलेले. जे की पहिल्या दिवशी 74 आलेले. अमरावतीमध्ये 38 जणांनी, तर पुण्यात 35 जणांनी लस घेतली. आता यावरून लोकांचा कोवॅक्सीनवर विश्वास नाहीये, असं म्हणायचं का? तर तसंही ठामपणे सांगता येणार नाही. कारण सोलापूरच्या गव्हमेंट मेडिकल कॉलेजमध्येही कोवॅक्सीन लस देण्यात येतेय, पण तिथे शनिवारी 57 लसीचा डोस घेतला, तर मंगळवारी 52 जणांनी. त्यामुळे फारसा फरक दिसून आला नाही. तरीसुदधा कोवॅक्सीनबाबत लोकांमध्ये आणि खास करून वैद्यकीय कर्मचाऱ्यांमध्येच असलेल्या संशयावर आम्ही जे.जे. हॉस्पिटलचे डीन रणजित माणकेश्वर यांच्याशी बोललो, तेव्हा ते म्हणाले, ‘लसीची भीती नसावी, म्हणून मीच पहिले लस घेतली. जेजेमध्येच 250 जणांनी कोवॅक्सीनच्या ट्रायलमध्ये सहभाग घेतलेला, आणि त्यांना कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाहीयेत. अर्थात कुणाला काही वैयक्तीक शंका असतील, तर त्यावर मी भाष्य करू शकत नाही.’
औरंगाबादमधील गव्ह्मेंट मेडिकल कॉलेजशीही आम्ही या समस्येबाबत विचारणा केली…कर्मचाऱ्यांना फोन करून करून बोलवावं लागतंय, अशी परिस्थिती आहे तिथे. आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये असलेला हा संभ्रम किंवा त्यांच्या शंका दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणालेत. शिवाय केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय, की फक्त 0.18 टक्के लोकांमध्ये लसीचे दुष्परिणाम जाणवतायत, आणि त्यातील केवळ 0.002 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलीये. हे जगातील सर्वात कमी प्रमाण आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार, असं दोन्हीकडून आश्वस्त करण्यात येतंय, की कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लसी सुरक्षित आहेत, त्याचे दुष्परिणामही अगदी नगण्य आहेत. जर आरोग्य कर्मचाऱ्यांनीच लस घेतली नाही, तर बाकीचे कसा विश्वास ठेवणार आणि मुख्य म्हणजे आपण कोरोनासारख्या महामारीशी दोन हात कसे करणार? याचाही विचार व्हायला हवा.
ADVERTISEMENT