मुंबई: संभाजीराजे छत्रपती यांच्या समर्थनार्थ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुढे आली आहे. मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी संभाजीराजेंना सर्वच पक्षांनी मिळून बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे, असे ट्वीट केले आहे.
ADVERTISEMENT
या ट्वीटमध्ये त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणुका होणार आहे. भाजप आणि शिवसेनेकडे दोन व काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे प्रत्येकी एक जागा निवडून येण्यासाठी संख्याबळ आहे, असा दावा या पक्षांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, सर्वपक्षांनी मिळून मला राज्यसभेवर निवडून द्यावं, असे आवाहन संभाजीराजेंनी केले होते. सहाव्या जागेसाठी रस्सीखेच सुरु होती. शिवसेनेने संभाजीराजे यांना शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी ऑफर दिली होती. मात्र, संभाजीराजे यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने शिवसेनेने मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला. त्यांच्याकडून कोल्हापूरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
संभाजीराजेंना उमेदवारी न दिल्याने मराठा संघटना आक्रमक झाले आहेत. त्यामुळे पुढील काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते बाळासाहेब थोरात यांच्या घरावर चाल करुन जाणार असल्याचा इशारा या संघटनांनी दिला आहे.
आता या इशाऱ्यानंतर मनसे देखील संभाजीराजेंच्या पाठीशी उभी राहिली आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील हे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, ‘राज्यातील गडकिल्ले संवर्धन व मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या छत्रपतींना पक्षात येण्याची अट कशासाठी? प्रत्येक गोष्टीत राजकारणच केलेच पाहिजे का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
त्याचबरोबर ‘सर्वच पक्षांनी छत्रपती संभाजीराजे यांना राज्यसभेवर बिनविरोध पाठविण्याचे पुण्य आपल्या पदरात पाडून घ्यावे’, असं देखील राजू पाटील यांनी आपल्या ट्वीटच्या शेवटी म्हणाले आहेत.
एकंदरीतच पाहिलं तर राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संभाजीराजेची एन्ट्री झाल्याने चुरस वाढली आहे. शिवसेनेने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजप काय भूमिका घेते, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कारण भाजपकडे देखील दोन उमेदवार निवडून येतील इतकी संख्या आहे. त्यामुळे भाजपच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे. तसेच शिवसेनेकडून उमेदवार जाहीर केल्यानंतर आतापर्यंत संभाजीराजे यांची अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. म्हणून संभाजीराजे यापुढे काय पाऊल उचलतात, हे देखील पाहावं लागेल.
ADVERTISEMENT