पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगात ट्विटरवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेत्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अशात नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या फोटोची चर्चा दिवसभर रंगली आहे. अमेरिकेसाठी जेव्हा ते विमानात बसले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक फोटो पोस्ट केला. हा फोटो रात्रीपासून आज दिवसभर चर्चेत आहे.
ADVERTISEMENT
बुधवारी दुपारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यासाठी रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी मोदी अमेरिकेला रवाना झाले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत करोना महासाथ, दहशतवाद, हवामान बदल व इतर महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत, असं मोदी म्हणाले. मोदींनी विमानात बसल्यानंतर काम करतानाचा एक फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता. रात्री पावणे अकराच्या सुमारास नरेंद्र मोदी यांनी फोटो शेअर केला.
काय आहे या फोटोत?
दीर्घकाळाचा विमान प्रवासातही काम सुरू आहे. काही महत्त्वाच्या फाईल्स पाहण्यासाठी हा दीर्घकाळाचा प्रवास उपयोगी असतो या आशयाचं ट्विट मोदींनी केलं. त्यानंतर या फोटोवर एकच चर्चा सुरू झाली.
या फोटोला आत्तापर्यंत साडेनऊ हजार पेक्षा जास्त लोकांनी रिप्लाय केलाय. १४ लाखांहून अधिक लोकांनी हा फोटो लाईक केला आहे आणि 23 हजारपेक्षा जास्त लोकांनी हा फोटो रिट्विट केला आहे. (ही बातमी करेपर्यंतची संख्या आहे)
लाईट आणि बॅगेच्या कुलुपाबाबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी जर काम करत आहेत तर ते बसले आहेत तिथे वर लाईट हवा, खालून लाईट कसा येतो आहे? असे प्रश्न काही युजर्सनी उपस्थित केले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या बॅगेला असलेल्या कुलुपाकडेही अनेकांनी लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्यमवर्गीय आहेत अशा कमेंट करत काही नेटकऱ्यांनी त्यांच्या बॅगेच्या कुलुपाकडे लक्ष वेधलं आहे. ट्रेन किंवा बसने प्रवास करायचा असेल तर मध्यमवर्गीय लोक बॅगेला कुलुप लावतात मात्र इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विमान प्रवासातही त्यांच्या बॅगेला कुलुप लावलं आहे त्याचीही ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगली आहे.
दरम्यान मोदी विरोधकांनी या फोटोवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काम करत असल्याचा हा फोटो म्हणजे मोदींचा दिखाऊपणा आहे असं काही जण म्हणत आहेत. तर काहींनी हे चक्क फोटो शूट आहे असाही दावा केला आहे. तर भाजपचे समर्थक त्यांना उत्तर देत आहेत. मोदी हे देशाच्या सेवेसाठी तत्पर आहेत ते प्रवासतला वेळही वाया घालवत नाहीत असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांना भाजपच्या समर्थकांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT