Republic Day 2022 History, Significance: भारत यावर्षी आपला 73वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. यावेळी प्रजासत्ताक दिनाचा उत्सव काही दिवसांपूर्वीच सुरू झाला होता. 1947 मध्येच देशाला ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळाले, मात्र तीन वर्षांनी 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधान लागू झाले. त्यामुळे दरवर्षी 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.
ADVERTISEMENT
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तथापि, 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्वीकारली म्हणून देशात दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा केला जातो.
दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 26 जानेवारीच्या दिवसाचे मुख्य आकर्षण म्हणजे परेड. जी दिल्लीच्या राजपथपासून सुरू होते आणि इंडिया गेटपर्यंत जाते.
या वर्षी या परेडमध्ये विविध राज्ये, विभाग आणि सशस्त्र दलांच्या 16 लष्करी तुकड्या, 17 लष्करी बँड आणि 25 चित्ररथांचा समावेश असतो. या दिवशी राष्ट्रपती राजपथावर ध्वजारोहण करतात.
या कार्यक्रमात भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय हवाई दलाने भारताच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे प्रदर्शन करत असतं. यासोबतच राजपथावर वेगवेगळ्या राज्यांचे चित्ररथ येतात, जे त्या-त्या राज्यातील संस्कृती दर्शवतात. यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाची राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
दिल्ली मेट्रोची पार्किंग सेवा बंद करण्यात आली आहे. तर अनेक स्थानकांवर काही तासांसाठी एक्झिट आणि एंट्री बंद ठेवण्यात येईल.
प्रजासत्ताक दिनाचा इतिहास (Republic Day 2022 History)
प्रजासत्ताक दिनाच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले. संविधान सभा, ज्याचा उद्देश भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हा होता, त्याचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी भरले होते. तर शेवटचे अधिवेशन २६ नोव्हेंबर 1949 रोजी संपले आणि त्यानंतर एक वर्षानंतर संविधान स्वीकारले गेले. भारताला तीन वर्षांपूर्वी 1947 मध्येच स्वातंत्र्य मिळाले होते. मात्र देशाची राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 साली लागू झाली. त्यामुळेच हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व (Republic Day 2022 Significance)
प्रजासत्ताक दिन हा स्वतंत्र भारताच्या आत्म्याचे प्रतीक आहे. 1930 मध्ये या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वराज घोषित केले होते. हा दिवस भारतीय जनतेला लोकशाही पद्धतीने त्यांचे सरकार निवडण्याच्या शक्तीची आठवण करून देतो. हा दिवस देशात राष्ट्रीय सुट्टी देखील आहे.
महाराष्ट्रातील ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव; चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक
राजपथावरील परेड नेमकी कशी असणार?
प्रजासत्ताक दिन परेड सकाळी 10.30 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12 वाजता त्याचा समारोप होईल. यावेळी दोन टीम – इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) ची एक पुरुष टीम आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) ची महिला टीम – मोटरसायकलवर स्टंट करतील.
परेड सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पहार अर्पण करून सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहतील.
लेफ्टनंट जनरल विजय कुमार मिश्रा, जनरल ऑफिसर कमांडिंग दिल्ली एरिया हे परेड कमांडर असतील आणि मेजर जनरल आलोक काकर, चीफ ऑफ स्टाफ दिल्ली एरिया हे यंदाच्या परेडचे सेकंड-इन-कमांड असतील. परेडदरम्यान राजपथावरून विजय चौक ते नॅशनल स्टेडियमपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे.
ADVERTISEMENT