अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट होणार का? चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलं उत्तर, म्हणाले…

ऋत्विक भालेकर

• 09:17 AM • 02 Sep 2022

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे ४ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस ते मुंबईत असणार आहेत. या भेटी दरम्यान ते लालबागच्या राजाचं दर्शन तर घेणारच आहेत. मात्र राजकीय भेटीगाठीही घेणार आहेत. मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. अशात राज ठाकरेंनाही अमित शाह भेटणार आहेत […]

Mumbaitak
follow google news

देशाचे गृहमंत्री अमित शाह हे ४ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस ते मुंबईत असणार आहेत. या भेटी दरम्यान ते लालबागच्या राजाचं दर्शन तर घेणारच आहेत. मात्र राजकीय भेटीगाठीही घेणार आहेत. मुंबई महापालिका आणि इतर महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने अमित शाह यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जातो आहे. अशात राज ठाकरेंनाही अमित शाह भेटणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले आहेत चंद्रशेखर बावनकुळे ?

राज ठाकरे हे आमचे चांगले मित्र आहेत. मी देखील त्यांची भेट घेतली होती. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांना भेटले होते. या सगळ्या भेटी सदिच्छा भेट आहेत. त्याचा काही वेगळा किंवा राजकीय अर्थ काढू नका. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते कुणाला भेटणार आणि कुठे कुठे जाणार हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे. अद्याप आम्हाला याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

बाळासाहेब ठाकरे नेमके कुणाचे? उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदेंचे?

महाराष्ट्रात भाजप नेत्यांनी एकामागोमाग जाऊन शिवतीर्थवर राज ठाकरेंची भेट घेतली आहे. चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तिन्ही मागच्या काही दिवसातच राज ठाकरेंना भेटले आहेत. अशात आता मुंबईत आल्यानंतर अमित शाह हे जर राज ठाकरेंना भेटले तर त्याचा अर्थ नक्कीच सदिच्छा भेट असा काढला जाणार नाही. ही भेट राजकीयच असेल यात काही शंका नाही. अमित शाह आणि राज ठाकरे यांची भेट होणार याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अद्याप आपल्याला याबाबत माहिती नाही असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांनी भेटीची शक्यता नाकारलेली नाही.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काय झाली चर्चा? बाळा नांदगावकरांनी दिलं उत्तर..

राज ठाकरेंच्या मनसेची आणि भाजपची युती होणार का?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत राहिले आहेत. गुढीपाडव्याला त्यांनी केलेलं भाषण गाजलं. त्यानंतर घेतलेली उत्तरसभा आणि त्यापुढच्या सभाही गाजल्या. मशिदींवरच्या भोंग्यांचा आवाज बंद झाला पाहिजे नाहीतर आम्हाला हनुमान चालीसा सुरू करावी लागेल हा इशारा त्यांनी दिला होता. ज्याचा परिणाम मुंबईसह महाराष्ट्रात पाहण्यास मिळाला. राज ठाकरेंची मनसे आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने काय काय पावलं उचलली जातात ते पाहणं महत्त्वाचं आहे.

उद्धव ठाकरेंनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जी हातमिळवणी केली त्यानंतर त्यांनी हिंदुत्व सोड्याची टीका त्यांच्यावर सातत्याने होते आहे. अशात राज ठाकरे ही पोकळी व्यापण्याचा त्यांच्या परिने पूर्ण प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जर मुंबई दौऱ्या दरम्यान अमित शाह आणि राज ठाकरेंची भेट झाली तर ती भेट फक्त सदिच्छा भेट नक्कीच नसून राजकीय असणार आणि त्यात महापालिका निवडणुकांवर चर्चा होणार यात काहीही शंका नाही.

    follow whatsapp