महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती होण्याची चिन्हं आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे.मुंबईत बुधवारी 700 हून जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर महाराष्ट्रात ही संख्या 1 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक करत आहेत.
ADVERTISEMENT
या बैठकीत हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मागच्या कॅबिनेट मिटिंगमध्येच मास्क वापरण्यावर भर दिला गेला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर आता आज बैठकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महाराष्ट्रातल्या मास्क सक्तीबाबत राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले….
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दिले संकेत
आज अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की सध्या राज्यात रूग्णांची संख्या वाढते आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्हाला डॉ. व्यास सगळ्या प्रकारची माहिती देतात. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललं आहे हे आम्हाला सांगतात तसंच जगात काय चाललं आहे तेदेखील व्यास सांगत असतात. या सर्व माहितीतून आम्हाला हे कळलं आहे की राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मात्र व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडवर असलेल्या रूग्णांची संख्या फारच कमी आहे.
मास्क सक्तीविषयी पुन्हा विचार करावाच लागेल. काही राजकारणी मास्क लावत नव्हते त्यांना पुन्हा कोरोना झाला असंही अजितदादांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरेंना हा टोला लगावला. तसंच गरज पडली तर राज्यात पुन्हा मास्क सक्ती होऊ शकते असेही संकेत दिले आहेत.
अशात आता टास्क फोर्ससोबत जी बैठक होणार आहे त्या बैठकीत काय होणार आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मास्क सक्त झाली तर राज्यात पुन्हा सर्व नागरिकांना मास्क लावणं बंधनकारक असणार आहे.
गुढीपाडव्यापासून म्हणजेच 2 एप्रिलपासून राज्यातली मास्क सक्ती शिथील कऱण्यात आली आहे. तसंच कोरोनाचे निर्बंधही शिथील करण्यात आले आहेत. असं असलं तरीही फेब्रुवारी महिन्यानंतर बुधवारी म्हणजेच 1 जून रोजी पहिल्यांदाच राज्यातल्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 1 हजारांच्या पुढे गेली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ही बैठक बोलवण्यात आली आहे.आता या बैठकीत नेमका काय निर्णय होतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मागच्या दोन वर्षात कोरोनाने जगभरात धुमाकूळ घातला होता. मात्र मार्च महिन्यापासून कोरोनाची आकडेवारी कमी झाली. मात्र आता कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. राज्यातील आणि मुंबईतील कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर मास्क वापरण्याचं आवाहन केलं जातं आहे. रूग्णसंख्या आटोक्यात ठेवण्यासाठी कदाचित काही निर्णय घेतले जाऊ शकतात यातला एक निर्णय मास्क सक्तीचाही असू शकतो.
ADVERTISEMENT