ठाणे: लोकलच्या महिला डब्यात कोणताही गुन्हेगार अगदी सहज शिरून गुन्हा करून फरार होऊ शकतो हेच पुन्हा समोर आलं आहे. महिला डब्यातील महिला प्रवाशी आजही सुरक्षित नाहीत अशीच घटना ठाण्यात घडली आहे. कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमध्ये मोबाईल चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत रेल्वेखाली येऊन विद्या पाटील (वय 35) वर्ष यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
ADVERTISEMENT
याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी फैजल शेख या सराईत गुन्हेगाराला मुंब्रा भागातून अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे या आरोपीवर याआधी तब्बल 21 गुन्हे दाखल आहेत. या घटनेनंतर महिला रेल्वे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अनेक ठिकणी महिलांसंबंधित गुन्हे घडतात आणि त्यानंतर महिलांबाबत सुरक्षा वाढवली जाते. असेच काहीसे रेल्वे विभागात ही बघायला मिळतं. अनेक दुर्घटना महिला रेल्वे डब्यात घडल्यानंतर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले. परंतु सध्याच्या घडीला हे सुरक्षा रक्षक डब्यात असतात का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
धक्कादायक… साताऱ्यात 12 वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; आरडाओरड करताच नराधमाने मुलीला ट्रेनमधून फेकलं
डोंबिवली येथे राहणाऱ्या विद्या पाटील या अंधेरीमध्ये एका खासगी कंपनीत कामाला होत्या. शनिवारी सायंकाळी त्यांनी कुर्ला रेल्वे स्थानकातून डोंबिवलीला जाण्यासाठी रेल्वे पकडली. त्यावेळी त्यांच्या महिला डब्यामध्ये केवळ पाच ते सहा महिला प्रवासी होत्या. रेल्वे कळवा रेल्वे स्थानकात आली असता एक चोरटा त्या गाडीमध्ये शिरला. त्यानंतर त्याने विद्या यांच्या हातात असलेला मोबाईल खेचला. विद्या यांनी त्यास प्रतिकार केला. या झटापटीमध्ये विद्याा यांना चोरट्याने हिसका दिल्याने त्या धावत्या रेल्वेखाली आल्या आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ही घटना कळवा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या घटनेप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यातील आरोपी हा मुंब्रा येथे राहत असल्याची माहिती ठाणे लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीतून त्याला ताब्यात घेतलं. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली देखील दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
रेल्वे संदर्भात राज्यात कठोर निर्बंधांमुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वे प्रवास करण्यास मुभा असतानाही चोरट्याने रेल्वे डब्ब्यात प्रवेश केल्याने स्थानकातील सुरक्षेबरोबर महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच ज्या इसमावर 21 गुन्हे दाखल आहेत तो असा मोकाट कसा? हा देखील सवाल रेल्वे संघटनेने उपस्थित केला आहे. तर या घटनेच्या वेळी जे पोलीस अधिकारी रेल्वे स्थानकावर उपस्थित होते त्यानं निलंबित करा तसेच विद्या हिच्या मुलांचे संगोपन रेल्वे प्रशासनाने करावे अशी मागणीही रेल्वे संघटनेकडून करण्यात आली आहे.
लॉकडाउनमुळे काम बंद, पैश्यांसाठी हॉटेलचे कुक बनले मोबाईल चोर
कोरोनाच्या काळात सर्वसामान्य लोकांना लोकल गाडीत प्रवेश नाही, परंतु एखादा चोर किंवा गुन्हेगार अगदी सहज लोकलच्या महिला डब्यात कसा काय प्रवेश करू शकतो? हा सवाल उपस्थित विद्याच्या पतीने केला आहे.
ठाण्यातील कळवा व मुंब्रा हा रेल्वे मार्ग गर्दुल्ल्यांचा अड्डाच झाला आहे. याआधी याच परिसरात अनेक गुन्हे घडले आहेत. चालत्या लोकलमधून मोबाईल हिसकवणे, पर्स खेचणे, पाकीटमारी यासारखे अनेक प्रकार याच स्थानका दरम्यान घडतात. त्यामुळे या स्थानकावर रेल्वे पोलिसांचे जास्त लक्ष असणं गरजेचं असताना तसं न घडल्याने विद्या पाटील या महिलेला आपला हकनाक जीव गमवावा लागला आहे.
ADVERTISEMENT