विजयकुमार बाबर, सोलापूर: ‘पुत्र पाठीशी ढाल… हाताशी, कमरेला तलवार… स्वातंत्र्याचे निशाण आम्ही नाही सोडणार…’ या राणी लक्ष्मीबाई यांच्यावर रचलेल्या शौर्यागीताची आठवण यावी अशी कठीण चढाई सोलापूरातल्या श्रुती गांधी या रणरागिणीने केली आहे. होय.. आपल्या 18 महिन्यांच्या मुलीला पोटाशी घेऊन श्रुती गांधी या आईने चक्क महाराष्ट्राचं सर्वोच्च शिखर कळसुबाई सर केलं आहे.
ADVERTISEMENT
संपूर्ण जगाला हेवा वाटावा असा हा आपला वीरांचा आणि रणरागिनींचा हा महाराष्ट्र मुलुख आहे. याच महाराष्ट्रात जिजाऊ, छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणारे अनेक मावळे आणि हिरकण्या आजही आहेत. हेच श्रुती गांधी या एका महिलेने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
माने परिवाराची लेक लग्न झाल्यावर गांधी परिवाराची सून झाली. श्रुतीवर शिवपराक्रमाचा पगडा आहे हे माहीत असल्याने तिला माहेर आणि सासरच्या अशा दोन्ही कुटुंबीयांनी तिला स्वातंत्र्य दिले. तशी ती दोन्ही कुटुंब ही शिवविचारांवर श्रद्धा ठेवणारी आहेत. त्यामुळे श्रुतीच्या गडकिल्ले भ्रमंतीला वाव मिळाला.
यापूर्वी लग्नानंतर सात महिन्यांची गर्भार असताना याच श्रुती गांधी यांनी प्रतापगड सर केला होता. आता कन्या उर्वीच्या जन्मांनंतर माने आणि गांधी परिवाराला तिचा वाढदिवस कळसुबाई शिखरावर साजरा करायचा होता. पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. मात्र आता तिसऱ्या लाटेपूर्वी, 18 महिन्यांच्या उर्वी या श्रुतीला घेऊन रविवारी म्हणजे 9 जानेवारीला जिजाऊ जयंतीच्या औचित्यावर कळसूबाईवर चढाई केली.
पहाटे साडे चार वाजता त्यांनी चढाईला सुरुवात केली होती. अन् सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास या मायलेकींनी कळसुबाई शिखर सर केलं होतं. हातात भगवा आणि तिरंगा घेऊन त्यांनी नभाला नमस्कार केला. स्वराज्यातल्या हिरकणीची आठवण या निमित्ताने ताजी झाली.
आजच्या युगातील स्त्री आपलं घरदार आणि मुलंबाळं सांभाळून सर्वच क्षेत्रात यशाच्या पताका फडकवित आहेत. अशावेळी श्रुतीने केलेलं हे साहस अनेक महिलांना बळ देणारं आहे.
ADVERTISEMENT