गेल्या काही दिवसांपासून यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अंतिम वर्षात शिकत असलेल्या डॉ. अशोक पाल या विद्यार्थ्याच्या हत्येचं प्रकरण चांगलंच गाजत होतं. १० नोव्हेंबर रोजी डॉ. अशोक पाल यांची हत्या झाल्यानंतर संतप्त विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनाविरोधात निदर्शन केली होती.
ADVERTISEMENT
या हत्येचा उलगडा करण्यात यवतमाळ पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी ३ आरोपींना अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरुन डॉ. अशोक यांची आरोपींनी हत्या केल्याचं निष्पन्न झालंय.
डॉ. अशोक पाल हे १० नोव्हेंबरला ग्रंथालयातून वसतीगृहाकडे जात असताना बाईकवरुन जाणाऱ्या काही तरुणांचा त्याला गतिरोधकावर धक्का लागला. यातून निर्माण झालेल्या वादामुळे दुचाकी स्वाराने आपल्याजवळ असलेल्या चाकुने डॉ. अशोक पाल याच्यावर वार केले, ज्यात त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात ऋषिकेश साळवे, प्रवीण गुंडजवार आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.
अशोक पाल यांच्या हत्येनंतर महाविद्यालयातील शिकाऊ डॉक्टरांनी कामबंद आंदोलन केलं होतं. संतप्त विद्यार्थ्यांनी आंदोलन करत पोलीस प्रशासनावर दबाव वाढवला होता. यवतमाळ पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी ७ पथकं कार्यान्वित केली होती. तसेच १०० माहितगारांचं एक पथक पोलिसांनी सक्रीय करत आरोपींचा माग काढायला सुरुवात केली होती. तांत्रिक सहाय्याने अखेरीस तिन्ही आरोपींना जाळ्यात अडकवण्यात अखेरीस पोलिसांना यश आलंय.
डॉ. अशोक पाल हे मुळचे ठाण्याचे असल्याचं कळतंय. आरोपींनी अशोक यांच्यावर वार केल्यानंतर ते बराच काळ घटनास्थळावर पडून होते. काही लोकांना अशोक रस्त्यावर पडलेला दिसल्यानंतर त्यांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं, परंतू तोपर्यंत अशोकची प्राणज्योत मालवली होती.
ADVERTISEMENT