वाझे माझ्या दुकानात येऊन गेले, ‘त्या’ दुकानदाराची महत्वाची माहिती

मुंबई तक

• 12:00 PM • 16 Mar 2021

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीत अनेक नंबरप्लेटही सापडल्या होत्या. या नंबरप्लेटचं गुढही समोर आलं आहे. मुंबईच्या विक्रोळी भागातील एका दुकानातून वाझे यांच्या पथकाने या नंबरप्लेट घेतल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे या दुकानाचा मालक नवीन तलरेजानेही सचिन […]

Mumbaitak
follow google news

मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात NIA ने मुंबई पोलीस दलाचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीत अनेक नंबरप्लेटही सापडल्या होत्या. या नंबरप्लेटचं गुढही समोर आलं आहे. मुंबईच्या विक्रोळी भागातील एका दुकानातून वाझे यांच्या पथकाने या नंबरप्लेट घेतल्या होत्या. महत्वाची गोष्ट म्हणजे या दुकानाचा मालक नवीन तलरेजानेही सचिन वाझे आपल्या दुकानात येऊन गेल्याचं सांगितलं आहे.

हे वाचलं का?

“माझ्या दुकानात सर्वजण येऊन नंबरप्लेट घेऊन जातात. मनसुख हिरेन यांना मी ओळखायचो, त्यांच्यासोबत माझे बिझनेस रिलेशन होते. एकदा सचिन वाझे माझ्या दुकानात अंदाजे ५ पोलीस अधिकाऱ्यांसोबत आले होते. यानंतर चौकशीसाठी त्यांनी मला ऑफिसमध्ये बोलावलं…साधारण तासाभराने मी परत आलो. दुसऱ्या दिवशी पोलिसांची आणखी एक टीम तिकडे आली आणि त्यांनी माझ्या दुकानातले सर्व रेकॉर्ड्स, सीसीटीव्ही, डायरी चौकशीसाठी ताब्यात घेतलं.” तलरेजा यांनी मुंबई तक शी बोलताना माहिती दिली.

सचिन वाझेंनी आपली चौकशी करताना माझं लायसन्स चेक केलं, कोणाचे फोन आले का अशी विचारणा केली. यानंतर आपली चौकशी पुन्हा झाली नसल्याचं तलरेजा यांनी सांगितलं. दोनवेळा क्राईम ब्रांचचे अधिकारी येऊन गेले मात्र याव्यतिरीक्त NIA आणि ATS चे अधिकारी चौकशीसाठी आले नसल्याचंही तलरेजा यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आगामी काळात वाझे यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

वाझेंना NIA ने अटक का केली?

अँटेलिया बाहेर सापडलेली स्कॉर्पिओ, त्यातील जिलेटिनच्या कांड्या यामुळे या साऱ्या प्रकरणात NIA या केंद्रीय तपास यंत्रणेचा प्रवेश झाला. NIA ने जेव्हा या साऱ्या प्रकरणाची चौकशी सुरु केली तेव्हा या प्रकरणाचे तपास अधिकारी सचिन वाझे हे होते. त्यामुळे NIA ने सचिन वाझेंकडून यासंबंधी माहिती घेण्यासाठी बोलावले होते. पण वाझे चौकशीला आले तेव्हा त्यांचा फोन घेऊन आले नव्हते. संशयित म्हणून वाझेंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं नव्हतं.

वाझे या प्रकरणाचा तपास सुरुवातीपासून करत होते. पण चौकशीदरम्यान वाझे सहकार्य करत नव्हते. वाझेंनी आपल्या कुटुंबीयांचा फोन नंबर देखील दिला नाही. म्हणून त्यांच्या अटकेविषयी त्यांच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली आणि वाझेंना अटक करण्यात आली. माहिती घेण्यासाठी बोलवले असताना फोन न घेऊन जाणं आणि कुटुंबीयांचा नंबर न देणं या घटनांमुळे सचिन वाझेंवरचा संशय अधिक बळावला.

वाझेंच्या सोसायटीचं CCTV फुटेज का आहे चर्चेत, नेमका घटनाक्रम काय?

    follow whatsapp