बीड: युवासेनेच्या वरिष्ठ नेत्याच्या जाचास कंटाळून अंबाजोगाई युवासेना तालुका प्रमुखाने विषारी किटकनाशक औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. अक्षय भूमकर (वय २५) असं या तालुका प्रमुखाचं नाव आहे. बुधवारी रात्री उशीरा सोबतच्या मित्रांमुळे हा प्रकार उघडकीस आला. अक्षय भूमकर याच्यावर सध्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
ADVERTISEMENT
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्र लिहून आत्महत्या करत असल्याचं पत्र अक्षयने सोशल मिडीयावर पोस्ट केलं होतं. युवासेना विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्या जाचास कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. अंबाजोगाईमध्ये पंचायत समिती आवारात त्याने विषारी औषध प्रशासन केले.
अक्षयचे उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंना पत्र :
मा. श्री. उध्दवजी ठाकरे साहेब,
शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना भवन, दादर, मुंबई.
मा. श्री. आदित्यजी ठाकरे साहेब , युवासेना प्रमुख , शिवसेना नेते, युवासेना कार्यालय शिवसेना भवन, दादर मुंबई.
विषय : युवासेना विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्या जाचास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे.
महोदय
सस्नेह जय महाराष्ट्र साहेब ,
मी अक्षय भुमकर युवासेना तालुकाप्रमुख अंबाजोगाई जि. बीड. वरील विषयानुसार विपुल बाळासाहेब पिंगळे यांनी मला गेल्या वर्षी ऑगस्ट २०२१ मध्ये स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालयाच्या वाढीव संरक्षण भिंतीचे आणि फर्निचरचे काम पिंगळे कन्स्ट्रक्शन कंपनी बीड , यांच्या मार्फत ३८ लक्ष रूपयाचे काम ३५.०२ कमी रक्मेने निविदा स्वीकृत करून काम करण्यास भाग पाडले असता माझी तयारी नसताना देखील मला काम करण्यास भाग पाडले. कारण हे काम स्वीकारले नसते तर सदरील १ पिंगळे कन्स्ट्रक्शन कंपनी बीड हि तीन वर्षांसाठी ब्लॉक लिस्टमध्ये जात होती. म्हणून आम्ही आग्रह खातर काम करण्याची तयारी दाखवली,
सदरील काम करण्याची माझी परिस्थीती नसताना हि मी अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील असून तरी देखील मी सहकारी भागीदारीत हे काम करण्यास तयार झालो. सदरील काम पूर्ण करण्याकरता मी आणि माझे या कामातील भागीदार आम्ही सदरील कामाचे सामान दुकानातून काही नगदी खरेदी केले तर काही उधारी, आणि इतर पैसे हे व्यवहारीक पातळीवर हात उसणे आणि व्याजाने काढून काम पूर्ण केले असता प्रथम बिलाच्या ७ लाख रूपयाच्या बिलाच्या रक्कमेतील ४ लाख ९ हजार रूपये मला त्यांनी दिले व नंतरच्या अंतिम बिलाच्या २१ लाख रूपयाच्या रक्कमेतील पैसे कन्स्ट्रक्शन कंपनीच्या बँक खात्यात १४ नोव्हेंबर रोजी २१ लाख ३७९०० रूपये जमा होऊन १ महिना उलटून जात असून देखील मला त्यातील १ रूपया ही परत विपुल बाळासाहेब पिंगळे यांनी दिला नाही.
मी सतत अंबाजोगाई ते बीड येथे दुचाकीवरून आठ दिवस प्रवास करून दररोज पैशा करीता त्यांच्याकडे जाऊन मागणी केली असता एकही दिवस भेट न घेता उडवा उडवीची भामटी कारणे सांगून पैसे देण्यास टाळाटाळ केली आणि आजायगत पैसे दिले नाहीत. संबंधित सर्व विषय विपुल पिंगळे यांचे वडील माझे राजकीय गुरुवर्य शिवसेना माजी जिल्हाप्रमुख बीड बाळासाहेब पिंगळे सर यांना सांगितला असता मला तेथुन ही प्रतिसाद मिळाला नाही. विपुल पिंगळे हे माझे फोन कॉल घेत नाहीत, नंबर माझा ब्लॉक लिस्टमधे टाकून ठेवला असून मेसेजचाही रिप्लाय देत नसून, ज्यांचे ज्यांचे मी उसने व्याजाने पैसे घेतले आहेत ते आणि ज्यांच्याकडून मी उधारीने माल घेतलेला आहे ते सर्वजण माझ्या घरी बसून आहेत. मला ते पैशा करीता घेऊन जात आहेत हा फक्त मला विपुल बाळासाहेब पिंगळे यांनी दिलेल्या त्रासामुळे मी आणि माझ्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन होत नसून मी विपुल बाळासाहेब पिंगळे यांच्यामुळे आत्महत्या करणार आहे.
कारण आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नसुन मी लोकांचे पैसे परत करू शकत नाही. ना मला ना माझ्या कुटुंबाला शेती आहे ना सरकारी नौकरी मी सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने माझी विपुल पिंगळे यांनी फसवणूक केली आहे. ही बाब काही बीड जिल्ह्यातील आणि पक्षातील अनेक पदाधिकार्यांना समजली असता आशाच प्रकारच्या अनेक पदाधिकाऱ्यांसोबत फसवणूक विपुल पिंगळेंनी केलेल्या प्रकरणाच्या अनेक बाबी निदर्शनास आल्या असून यामुळे मी येत्या ४ दिवसात १३-१२-२०२२ पर्यंत मला माझे सर्वच पैसे परत केले नाहीतर मी आत्महत्या करणार आहे.
मला आत्महत्या करण्यास विपुल पिंगळे यांनी प्रवृत्त केले असल्याने मी आत्महत्या केल्यास याला जबाबदार युवासेना विभागीय सचिव विपुल बाळासाहेब पिंगळे हेच जबाबदार राहणार असून माझ्या पश्चात माझे आई वडील आणि माझ्या कुटुंबाची झालेल्या अवहेलनेस विपुल पिंगळे जबाबदार असुन घरात मी माझे आई वडील स्वतंत्र राहत आहेत त्यामुळे माझ्या माघारी त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी मी आपल्यावर सोडत आहे साहेब अखेरचा मानाचा कडवट निष्ठावंत शिवसैनिकाचा आपणास जय महाराष्ट्र.
ADVERTISEMENT