महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय? असा प्रश्न सध्या संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे. एका बाजूला लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षांच्या एकजुटीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार (Sharad Pawar) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) भवितव्याबाबत अनिश्चितता व्यक्त करत आहेत. शिवसेना (UBT) गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडांच्या चर्चांवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तर त्याचवेळी राष्ट्रवादीतही याच कारणामुळे अजित पवार एकाकी पडलेले दिसत आहेत. पण दुसरीकडे त्यांच्या नावापुढे भावी मुख्यमंत्री म्हणूनही उल्लेख केला जात आहे. (With the help of posters ncp supporters have started projecting Ajit Pawar as the future Chief Minister)
ADVERTISEMENT
नेमकं काय आहे प्रकरण?
राष्ट्रवादी समर्थकांनी अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यास सुरुवात केली आहे. धाराशिवपाठोपाठ महाराष्ट्राची राजधानी मुंबईतही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या समर्थनार्थ पोस्टर लावले आहेत. मुंबईत लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून दाखवण्यात आले आहे. मुंबईतील अनेक भागात अजित पवार यांचे अशा प्रकारचे होर्डिंग्ज दिसत आहेत.
अजित पवारांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्याबरोबरच खारघर दुर्घटनेचाही उल्लेख या होर्डिंग्जवर करण्यात आला आहे. या होर्डिंग्जवर अजित पवार मुख्यमंत्री झाले असते तर खारघरमधील दुर्घटनेबाबत तातडीने कारवाई केली असती, असे म्हटले आहे.
केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रातील इतर भागातही अजित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. धाराशिव आणि मुंबई व्यतिरिक्त नागपूरच्या धरमपेठ परिसरात राष्ट्रवादीचे स्थानिक नेते प्रशांत पवार यांनी अजित पवार यांच्या नावाचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावले आहे.
अजित पवार यांच्या बंडाची चर्चा अन् मुख्यमंत्रीपदाची इच्छा :
अजित पवारांचे हे पोस्टर लावण्याबाबतच्या टायमिंगची मोठी चर्चा होत आहे. राज्यात सध्या अजित पवार यांच्या बंडखोरीची चर्चा आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे, या खटल्याचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने गेल्यास शिंदे-भाजप सरकार अल्पमतात येईल, असं सांगितलं जात आहे. अशावेळी सरकार वाचविण्यासाठी अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात अशा चर्चा आहेत. या चर्चांवरुनच अजित पवार आणि शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांच्यामध्ये कलगीतुरा रंगला होता. मात्र या चर्चांचा अजित पवार यांनीच इन्कार केला.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. शरद पवार यांनाही याबाबत स्पष्टीकरण द्यावे लागले होते.
या चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांनी सकाळ माध्यम समुहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री होण्याबाबत इच्छा व्यक्त केली आहे. मला मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल असे ते म्हणाले होते. मुख्यमंत्रीपुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदावर दावा सांगण्याच्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले होते की, आम्ही 2024 कशाला आताही मुख्यमंत्रीपदावर दावा करु शकतो, असं म्हटलं होतं. याच दरम्यान, उद्धव ठाकरे यांनीही राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यास राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होईल असा प्रस्ताव दिला असल्याची माहिती आहे. सोबतच अजित पवार यांच्या मुख्यमंत्री होण्यासही ठाकरे यांनी समर्थन दिलं असल्याच सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT