मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत महाराष्ट्रात उठलेलं राजकीय वादळ अजूनही शांत होताना दिसत नाही. आता मुंबईत होत असलेल्या राष्ट्रवादीच्या एका बैठकीला अजित पवार यांना निमंत्रणच नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बैठकीत पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) संबोधित करणार आहेत. सोबतच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, अनिल देशमुख, आदिती तटकरे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत, मात्र कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या नेत्यांच्या यादीत अजित पवारांचे नाव नसल्याची माहिती आहे. (NCP Leader Ajit Pawar was not invited to a party meeting in Mumbai)
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीची ही बैठक आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी बोलावण्यात आल्याची माहिती आहे. मात्र बैठकीच्यावेळी अजित पवार पुण्यात असणार असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे. दुसरीकडे, अजित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यमवर्ती बँकेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये पत्रकार परिषदेत सांगितले की, मुंबईत सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतून मला बाजूला करण्यात आले आहे, असा गैरसमज कोणी करू नये. माझे कार्यक्रम नियोजीत आहेत. आज संध्याकाळी एका माध्यम समुहातर्फे मुलाखत घेण्यात येणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अजित पवारांचं राज्यपालांना पत्र, केली मोठी मागणी…
अजित पवार भाजपसोबत जातील :
अजित पवार भाजपसोबत जाऊ शकतात, असा दावा शिवसेना (UBT) गटाचे नेते संजय राऊत यांनी नुकताच केला होता. संजय राऊतांनी 16 एप्रिलला रविवारी रोखठोक सदरात महाराष्ट्रात फोडाफोडीचा सीझन टू सुरू असल्याचा दावा केला. आतापर्यंत दबक्या आवाज सुरू असलेल्या या चर्चांना राऊतांनी शरद पवारांचा हवाला दिला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.
यावर अजित पवार यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात, त्या पक्षाचं सांगा ना काय सांगायचं ते. तुम्ही ज्या पक्षाचं मुख्यपत्र आहे, त्याबद्दल बोला. पण, तुम्ही आम्हाला कोट करून… ते असं झालं, तसं झालं… आम्ही आमची स्पष्टपणे भूमिका मांडायला खंबीर आहोत”.
तसंच आमच्याबद्दल बातम्या पेरण्याचं काम काही विघ्नसंतोषी लोक करत असतील. मी माझ्या पक्षाबद्दल म्हणत नाही. माझ्या पक्षात माझ्याबद्दल आकस असणारं कुणी नाही. परंतु पक्षाबाहेरचे आणि काही काही तर बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते ते आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखंच चाललंय. त्यांना कुणी अधिकार दिलाय कुणास ठावूक? पक्षाची बैठक ज्यावेळी होईल, त्यावेळी मी विचारणार आहे”, असं म्हणत अजित पवार यांनी खासदार संजय राऊत यांच्याबद्दल संताप व्यक्त केला.
Mumbai : बंडाची चर्चा! गौतम अदानी थेट शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर, 2 तास खलबतं
यावर राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधत “मी खरे बोललो आणि मला कोणी टार्गेट केले तर मी मागे हटणार नाही असे म्हटले होते. मी सत्य सांगत राहीन, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही” असे म्हटले होते. माझ्या माहितीनुसार भाजपचा दबाव आहे वगैरे सांगण्यासाठी काही आमदार शरद पवार यांना भेटले होते. त्यांनी काहींची नाव सांगितलेली नाहीत, असेही राऊत यांनी स्पष्ट केले होते.
इफ्तार पार्टीला शरद पवार – अजित पवार एकाच मंचावर :
शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंध सुरळीत नसल्याच्या चर्चा असतानाच 18 एप्रिल रोजी अजित पवार यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला शरद पवारांनी हजेरी लावली होती. यावेळी सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेतेही या सहभागी झाले होते. याआधी शरद पवार यांनी पुण्यातील पुरंदरमध्ये प्रसारमाध्यमांच्या मनात जी काही चर्चा सुरू आहे, ती आमच्या मनात नाही, असे सांगितले होते. या चर्चेला महत्त्व नाही. राष्ट्रवादीबद्दल मी म्हणू शकतो की आमचे सर्व मित्र पक्ष सारखेच आहेत. कोणाच्याही मनात दुसरा विचार नाही.
संजय राऊत यांनी घेतली शरद पवारांची पुन्हा भेट :
एका बाजूला हे राजकीय वातावरण तापलं असतानाच खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी पुन्हा शरद पवार यांची त्यांच्या घरी सिल्व्हर ओक येथे भेट घेतली. सुमारे 25 मिनिटे दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर संजय राऊत मीडियाशी न बोलता तेथून निघून गेले. दोघांमध्ये कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे कळू शकलेले नाही.
अजित पवारांना मुख्यमंत्रिपदानं किती वेळा हुलकावणी दिली आहे?
अजित पवार यांनी केले होते पंतप्रधान मोदींचे कौतुक :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच अदानी प्रकरणात जेपीसीची काँग्रेसची मागणी फेटाळून लावली होती. यानंतर अजित पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या करिष्म्याचे कौतुक केले. एवढेच नाही तर त्यांनी ईव्हीएमवरही विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले होते, माझा ईव्हीएमवर पूर्ण विश्वास आहे. एक व्यक्ती ईव्हीएममध्ये फेरफार करू शकत नाही, ही एक मोठी यंत्रणा आहे. हरलेला पक्ष ईव्हीएमला दोष देतो, पण तो जनतेचा आदेश आहे. ते म्हणाले होते की, ज्या पक्षाचे केवळ दोन खासदार होते, त्यांनी 2014 मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली जनादेश देऊन सरकार स्थापन केले आणि देशाच्या दूरवरच्या भागात पोहोचले, मग हा मोदींचा करिष्मा नाही का? असे ते म्हणाले होते.
ADVERTISEMENT