Prakash Ambedkar News Marathi : राज्यात महाविकास आघाडीचा आणि राष्ट्रीय पातळीवरील इंडिया आघाडीचा जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीला मविआमध्ये घेतल्याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काँग्रेसकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांच्या संयमाचा कडेलोट झाल्याचे पाहायला मिळाले. अमरावती येथे वंचितची सभा झाली. या सभेतून प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला इशारा दिला. (Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar hits out at Maha Vikas Aghadi)
ADVERTISEMENT
“काँग्रेसबरोबर महाविकास आघाडीतील इतर सर्वच नेत्यांच्या मानगुटीवर कारवाई तलवार लटकून आहे. त्यामुळे भीत-भीत निवडणुकीला सामोरे जाल,तर सर्वांच्याच मानगुटीवर तलवार कोसळेल आणि सोनिया गांधींपासूनच सर्वच तुरूंगात जातील. युती केली तरच टिकाल नाहीतर सर्वच तुरुंगात जाल”, अशा शब्दात वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी संताप व्यक्त केला.
दोन वर्षे झाली तरी समझोता नाही
सभेत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “महाविकास आघाडी सरकार जाऊन दोन वर्षे झाली आहेत, पण यांच्यात अजूनही समझोता झालेला नाही. जागा वाटप झाले नाही. त्यामुळे मला संशय वाटत आहे. यांना खरंच भाजप आणि मोदींना हरवायचं आहे का? हा माझा सवाल आहे. आम्हाला म्हणतात दोन जागा घ्या. यांना काय आम्हाला बळीचा बकरा करायचे आहे का?”, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.
हेही वाचा >> क्या हुआ तेरा ‘दादा’? ‘तो’ व्हिडिओ शेअर केला अन् अजितदादांनाच घेरलं
“दोन जागा कोणत्या असं काँग्रेसवाल्यांना विचारतो, तेव्हा ते सांगतात की, अजून आमचं ठरलं नाही. त्यामुळे जर भाजपला हरवायचे असेल, तर आघाडीमध्ये तुम्हाला लढावं लागेल. वंचित सोबत घेतलं तर ठिक नाहीतर आम्ही सर्व ४८ जागा लढवण्याचीही आमची तयारी आहे. भाजपचा एककलमी कार्यक्रम सुरू असून, त्यांना देशात फक्त एकच पक्ष ठेवायचा आहे”, असा इशारा आंबेडकर यांनी दिला.
आम्ही भाजपसोबत तुम्हालाही गाडू -प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले, “तुम्ही जर आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्यासोबत राहू. पण, तुम्ही आम्हाला विचारत नसाल आणि इथल्या गरीब मराठ्यांसारखा वापर करत असाल, तर ते जमणार नाही. तसं करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही भाजपसोबत तुम्हालाही गाडू”, असा इशारा आंबेडकरांनी महाविकास आघाडीला जाहीर सभेतून दिला.
हेही वाचा >> भाजपला ‘या’ 129 जागांची चिंता! मोदी पुन्हा सत्तेत कसे येणार?
“महाविकास आघाडीतील नेत्यांनी आधी त्यांच्या जागा वाटून घ्याव्यात. वाटाघाटी झाल्या नाही तर आम्ही ४८ जागा लढवणार आहोत. आमची तयारी झालेली आहे. आम्ही फक्त तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहोत”, असेही आंबेडकर यावेळी म्हणाले.
ADVERTISEMENT