Kiran Mane on Akshay Shine Case : काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानं देश हादरला. या घटनेत 27 लोक मारले गेले. निरपराध लोकांवर झालेल्या या हल्ल्याचा देशभरात निषेध करण्यात आला. मात्र, त्यानंतर आता अभिनेते किरण माने यांनी लिहिलेली एक पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. किरण माने यांनी पहलगामच्या घटनेचा संदर्भ देत अक्षय शिंदेच्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. अक्षय शिंदेची हत्या ही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकीच निर्घृण आहे असं किरण माने यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> प्रेमविवाहाचा राग, निवृत्त PSI बापाने हळदीच्या कार्यक्रमात लेकीला गोळी घालून संपवलं, तर जावईही...
बदलापूरमधील शाळेतील बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या आरोपी अक्षय शिंदेंला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. अक्षयने झटापटीत पोलिसांचं पिस्तूल हिसकावून गोळीबाराचा प्रयत्न केला, त्यावेळी त्याला गोळ्या घातल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र, न्यायालयाने या प्रकरणात पोलिसांवर ठपका ठेवत पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. यावरुनच किरण माने यांनी भाष्य केलं आहे.
किरण मानेंची पोस्ट काय?
बदलापूर बलात्कार गुन्हा घडल्यानंतर लगेच ‘मिडियाच्या मदतीनं’ आरोपी फिक्स केला. त्याचा एनकाऊंटरसुद्धा केला. मिडियानं त्या एनकाऊंटरला काऊंटर न करता ‘कव्हर’ केलं. नंतर न्यायालयात सिद्ध झालं की हा एनकाउंटर खोटा आहे !
त्यामुळे आरोप सिद्ध न होताच झालेली अक्षय शिंदेची हत्या ही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकीच निर्घृण आहे. लाजिरवाणी आहे. संतापजनक आहे.
…यावरून एक लक्षात घ्या, मिडिया जेव्हा ओढूनताणून कुणाला आरोपी ठरवते, त्यावेळी ओळखायचं की ‘खऱ्या आरोपीला’ वाचवण्याचा, कव्हर करण्याचा हा प्लॅन आहे. म्हणजेच मिडिया ज्याच्या इशाऱ्यावर चालतो, त्याचा हा स्वतःला किंवा मर्जीतल्या माणसाला वाचवण्याचा प्लॅन असू शकतो.
पहलगाम अतिरेकी हल्ला हा देशाच्या सुरक्षेला खिंडार पाडणारा अतिशय गंभीर प्रकार आहे. यात ‘आरोपी कोण आहे’ हे ठरवण्याचा अधिकार न्यायव्यवस्थेला आहे. मिडिया किंवा तुम्हाला-आम्हाला नाही. तोपर्यंत शातिरपणे जो जो माणूस स्वतः न्यायाधीश होऊन दुसऱ्या कुणाकडे बोट दाखवतो आहे… त्याच्याकडे चार बोटे वळलेली आहेत, हे लक्षात ठेवा.
पहलगाम हल्ला करणारे… त्यांना सुपारी देणारे… संपूर्ण प्लॅन आखणारे… सगळे लोक अतिशय कपटी-कारस्थानी असणार यात शंका नाही. ते सहजासहजी तुम्हाला कळेल असे कृत्य नक्कीच करणार नाहीत. उलट तुमची दिशाभूल होऊन तुम्ही भलत्याच लोकांवर संशय घ्यावा असं नक्कीच करणार. ‘धर्म विचारून मारणे’ हा त्याचाच एक भाग असणार !
…आणि मीडियानं नेमका ‘धर्म विचारून मारणे’ याचाच बभ्रा करणं, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीसाठी सत्ताधाऱ्यांना जाब न विचारणं. हे आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखं आहे.
जय श्रीराम.
हे ही वाचा >> पुण्यातील वरंध घाटात सापडला शीर नसलेला मृतदेह, हात-पायही बांधलेले, गुरं चारणाऱ्यांनी काय पाहिलं?
एकूणच, किरण माने यांच्या या पोस्टनंतर आणखी काय प्रतिक्रिया समोर येतात ते पाहणं महत्वाचं आहे. अनेकांनी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर म्हणजे शाळेच्या ट्रस्टींना वाचवण्यासाठी केला असल्याचं म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
