"तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता...", कुडाळच्या महिलेनं सांगितला धक्कादायक अनुभव

Pahalgam Terror Attack:प्रीती कदम यांनी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना या टॅक्सी चालकाचा शोध घेऊन तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी काढलेले फोटो आणि दिलेली माहिती तपासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते.

Mumbai Tak

मुंबई तक

28 Apr 2025 (अपडेटेड: 28 Apr 2025, 11:36 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पहलगामधील हल्ल्यापूर्वी कुडाळच्या महिलेला काय अनुभव आला?

point

कुडाळमधून पहलगामला गेलेल्या महिलांना टॅक्सीचालक काय म्हणाला?

कुडाळ, सिंधुदुर्ग : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल 2025 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्याच्या काही दिवस आधीच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील प्रीती कदम यांना काश्मीर दौऱ्यादरम्यान एका टॅक्सी चालकाच्या संशयास्पद वागणुकीमुळे हल्ल्याची चाहूल लागल्याचा धक्कादायक दावा त्यांनी केला आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> "अक्षय शिंदेलाही पहलगाम मधल्या निरपराध भावांइतकंच...", किरण मानेंची काय म्हणाले, निशाणा कुणावर?

नेमकी घटना काय? 

प्रीती कदम या आपल्या कुटुंबातील तीन अन्य महिलांसह चार जणी काश्मीर दौऱ्यासाठी गेल्या होत्या. पहलगाम येथे त्यांना एका टॅक्सी चालकाने अत्यंत उद्धट वागणूक दिली. आणि धमकावणारी वागणूक दिली. प्रीती कदम यांच्या मते, "तो टॅक्सी चालक अतिरेक्यासारखा वागत होता. त्याने आमचं सामान रस्त्यावर फेकलं, आमच्याकडून पैसे उकळले आणि मध्येच सोडून दिलं. त्याचं बोलणंही धक्कादायक होतं. तो म्हणाला, 'तुम्हाला कोणी गोळी मारली तरी आम्हाला फरक पडत नाही. मला पोलिस आणि एसआरपीचा तिटकारा आहे. मला फक्त पैशांशी मतलब आहे."

काय म्हणाल्या प्रिती कदम? 

"आम्हाला जो टॅक्सी ड्रायव्हर आला तो जरा रागीट आणि विचित्र स्वभावाचा होता. पहलगाममध्ये गेल्यावर पाईनचं जंगल दाखवत म्हणाला इथे सगळ्या चुडैल राहतात. पोलीसच्या गाड्या दिसल्यावर म्हणत होता पोलीस आणि सीआरपीएफशी खूप नफ्रत आहे. पुढे गेल्यावर गाडी स्टाईलमध्ये वळवून थांबवली आणि म्हणाला उतरो गाडी से... आमचं सामान खाली टाकून दिलं." 

या घटनेनंतर प्रीती आणि त्यांच्या सहकारी महिलांना दुसऱ्या टॅक्सीची वाट पाहत थांबावं लागलं. मुंबईत परतल्यानंतर 22 एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची बातमी समजताच प्रीती कदम यांना धक्का बसला. त्यांना टॅक्सी चालकाच्या वागणुकीतून हल्ल्याची चाहूल लागल्याची शंका निर्माण झाली. त्यांनी हा अनुभव कुडाळ येथील हॉटेल व्यावसायिक आणि पत्रकार राजन नाईक यांच्याशी शेअर केला. नाईक यांनी प्रीती यांना धीर देत त्यांचा अनुभव कॅमेऱ्यासमोर मांडण्यास प्रोत्साहित केलं.

हे ही वाचा >> पुण्यातील वरंध घाटात सापडला शीर नसलेला मृतदेह, हात-पायही बांधलेले, गुरं चारणाऱ्यांनी काय पाहिलं

प्रीती कदम यांनी सांगितलं की, त्या टॅक्सी चालकाचा आणि टॅक्सीचा फोटो त्यांनी काढला आहे. त्यांच्या मते, जर पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांनी या टॅक्सी चालकाला ताब्यात घेऊन तपास केला, तर अनेक गंभीर बाबी समोर येऊ शकतात. सध्या प्रीती कदम आणि त्यांचं कुटुंब घाबरलेलं असून, त्या मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यांनी यापुढे कधीही काश्मीरला पर्यटनासाठी जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

हल्ल्याची आधीच माहिती होती का?

पहलगाम हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या 'द रेझिस्टन्स फ्रंट' या दहशतवादी गटाने घेतली आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांचा धर्म विचारून हिंदू पुरुषांना लक्ष्य केलं आणि त्यांना गोळ्या घातल्या. प्रीती कदम यांच्या अनुभवामुळे टॅक्सी चालकाला हल्ल्याची आधीच माहिती होती का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यांच्या दाव्याने सुरक्षा यंत्रणांसमोर नवं आव्हान निर्माण झालं आहे.

पोलिस तपासाची मागणी

प्रीती कदम यांनी पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांना या टॅक्सी चालकाचा शोध घेऊन तपास करण्याची मागणी केली आहे. त्यांनी काढलेले फोटो आणि दिलेली माहिती तपासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. स्थानिक पत्रकार राजन नाईक यांनीही या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, यंत्रणांनी तातडीने कारवाई करावी, असं आवाहन केलं आहे.

या घटनेने काश्मीरमधील पर्यटन सुरक्षा आणि स्थानिकांच्या वागणुकीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रीती कदम यांच्या अनुभवावरून दहशतवादी हल्ल्याच्या कटाची आधीच माहिती स्थानिक स्तरावर होती का, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.

    follow whatsapp