भाजपचा कल्याणबरोबर ठाणे लोकसभेवरही दावा! CM एकनाथ शिंदेंवर दबाव?

मुंबई तक

12 Jun 2023 (अपडेटेड: 12 Jun 2023, 08:24 AM)

भाजपकडून कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदारसंघावरील भाजपचा दावा एकनाथ शिंदेंवर दबाब टाकण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.

Political conflict between BJP and Shiv Sena in Thane and Kalyan increased. what will Eknath Shinde do?

Political conflict between BJP and Shiv Sena in Thane and Kalyan increased. what will Eknath Shinde do?

follow google news

Maharashtra Politics Latest News : लोकसभा जागावाटपाच्या चर्चेला तोंड फुटल्यानंतर भाजप-शिवसेनेतील नेते पहिल्यांदाच एकमेकांना उत्तर देताना दिसले. राज्यातील जागावाटपाचा बाजूला पडून ठाण्यातीलच वाद शिगेला पोहोचला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबदबा असलेल्या ठाणे जिल्ह्यातच भाजप-शिवसेना युतीतील सुप्त संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. स्थानिक पातळीवरील हा संघर्ष इतका वाढला असून, कल्याणचे खासदार आणि मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी थेट राजीनामा देण्याचीच तयारी दर्शवली. दुसरीकडे भाजपकडून कल्याण बरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा करण्यात आला असून, हा एकनाथ शिंदेंवर दबाब टाकण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे. (Eknath Shinde news )

हे वाचलं का?

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मुद्द्यावरून हा वाद पहिल्यांदाच बाहेर आला. या प्रकरणावरून भाजपने शिवसेनेला सहकार्य न करण्याचा ठराव केला आणि राजकीय संघर्ष आणखी वाढला.

श्रीकांत शिंदे म्हणाले, खासदारकीचा राजीनामा देतो

भाजपची भूमिका ही श्रीकांत शिंदे यांना अडचणीत आणणारी असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे श्रीकांत शिंदेंनीही भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या भूमिकेवर टीका केली. श्रीकांत शिंदे यांनी “सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील यासाठी काम केले पाहिजे. यामध्ये स्वार्थ ठेवायला नको”, अशी समन्वयाची भूमिका मांडली. त्याचबरोबर “मलाही कुठला स्वार्थ नाही. मला जर उद्या सांगितलं की, कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या, तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. मी पक्ष आणि युतीचं काम करायला तयार आहे. पक्षनेतृत्वाने असो वा भाजपने सांगितलं की, कल्याणमध्ये चांगला उमेदवार मिळतोय, तर त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल, तसंच मी काम करेन”, असं म्हणतांना त्यांना नाराजी लपवता आली नाही.

श्रीकांत शिंदे यांच्या भूमिकेनं भाजप-शिवसेना युतीतील संघर्ष वाढला

खासदार श्रीकांत शिंदे आणि भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाण्यातील भाजपचे आमदार, नेते, पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेविरोधात थेट भूमिका घेताना दिसत आहे. आणि त्यामुळेच शिंदे पिता-पुत्रांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचे सांगितलं जात आहे.

कल्याणबरोबर ठाण्यावरही दावा

अशातच भाजपचे आमदार संजय केळकर यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांसमोरच एक विधान केले. “2014 च्या निवडणुकीत या जिल्ह्यातील अनेक लोक मोदी ट्रेनमध्येच बसून गेले. ते आपल्या पक्षाचे असो वा मित्रपक्षाचे असो. मोदींच्या नावाखाली ते निवडून आले आणि आता अनेक प्रकारचे दावे केले जातात. मला आश्चर्य वाटतं, कीव करावी वाटते. भाजपशिवाय या जिल्ह्यातून कुणीही निवडून जाऊ शकणार नाही, अशा प्रकारची ताकद भाजपमध्ये आहे. एवढे मोठे काम केले आहे. सेवेचे व्रत घेऊन काम केले आहे”, असे ते म्हणाले.

हेही वाचा >> भाजप-शिवसेना युतीत ‘ठिणगी’! श्रीकांत शिंदे म्हणाले, “खासदारकीचा राजीनामा देतो”

“अनेक ठिकाणी दावे सांगायला लागले आहेत. मला आश्चर्य वाटते. हा पण आमचा आहे, तो पण आमचाच आहे. अहो खरं म्हणजे सर्व जिल्हा भाजपचा होता. कल्याण असेल, ठाणे असेल, पालघर असेल सर्व भाजपचं होतं. कल्याण तर आहेच, पण ठाणे लोकसभा देखील भाजपची आहे… आहे की नाही? (असं केळकर यांनी भाजपच्या उपस्थितांना विचारलं) असेल तर हात वर करा. कल्याण लोकसभा देखील भाजपची आहे की, नाही?”, असं म्हणत केळकरांनी कल्याणबरोबर ठाणे लोकसभा मतदारसंघावरही दावा ठोकला.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर दबाबचा प्रयत्न?

महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा लढवण्याचा प्रयत्न भाजपचा असल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना सोबत येईपर्यंत भाजपने तशी तयारीही सुरू केली होती. भाजपची ही तयारी शिवसेनेसोबत युती झाल्यानंतरही सुरू आहे. त्यातच आता लोकसभा जागावाटपाची चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेनेकडे असलेल्या जागांवरही भाजपच्या नेत्यांकडून दावा केला जात आहे, त्यामुळे शिवसेनेतील नेते याला विरोध करत आहे. युतीत जास्त जागा मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्यावर दबाब टाकण्याचा प्रयत्न म्हणून ठाण्यातील घडामोंडीकडे बघितलं जात आहे. कल्याण आणि ठाणे या दोन्ही मतदारसंघावर भाजपकडून दावा केला जात आहे. भाजपचे हे दबाबतंत्र असल्याचे राजकीय वर्तुळातून सांगितलं जात आहे.

हेही वाचा >> “शरद पवारांना जे साधायचे ते त्यांनी साधलेच”, शिवसेनेचे (UBT) थेट भाष्य

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे त्यांना बरंच काही दिलं आहे, असं चित्र तयार गेलं. त्यामुळे पुढच्या काळात होणाऱ्या वाटाघाटींमध्ये भाजपचं वर्चस्व राहील. भाजपचा शब्द अंतिम राहील असेच संकेत या सगळ्यांमधून मिळत आहेत. भाजपने पहिलाच दावा हा कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघावर केला आहे. हा दावा ताकदीने केला जात असून, हा यशस्वी झाल्यास येत्या काळात भाजपचे वर्चस्व वाढलेले दिसू शकतं.

    follow whatsapp