काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी ठाण्यात पोहोचताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. एकनाथ शिंदे 9 एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर होते. महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळी पावसाने नुकसान झालेलं असताना शिंदेंनी अयोध्या दौरा केल्यानं बाळासाहेब थोरातांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं.
ADVERTISEMENT
ठाण्यात काँग्रेसची बैठक बोलण्यात आली. या बैठकीला काँग्रेसचे राज्यातील महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. बाळासाहेब थोरातही बैठकीनिमित्ताने ठाण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना थोरातांनी एकनाथ शिंदेंना अयोध्या दौऱ्यावरून टोले लगावले.
एकनाथ शिंदेंना खडेबोल, बाळासाहेब थोरात काय बोलले?
ठाण्यात बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, “त्यांचा राम नथुराम आहे. आमचा राम खरा आहे. प्रभू राम शेतकऱ्यांसोबत आहे. राज्यात अनेक समस्या आहेत. तरुण बेरोजगार आहेत. महागाई वाढली आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. पण, हे सगळे प्रश्न सोडवण्याऐवजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावर गेले. अशावेळी त्यांना प्रभू रामाने काय आशीर्वाद दिला असेल.”
हेही वाचा >> अदाणी, सावरकर, मोदींची डिग्री; शरद पवारांच्या गुगलीने विरोधकांचाच बिघडला खेळ!
“अयोध्येत जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेण्यासाठी इतका प्रचार करण्याची काय गरज आहे?”, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केला.
काँग्रेसच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा?
“ठाण्यात काँग्रेसचं अस्तित्व नाही, असं नाही. आमचं अस्तित्व जनतेच्या मनात आहे. जेव्हा निवडणुका होतील, तेव्हा कळेल की, कुणाचं किती अस्तित्व आहे. आजच्या बैठकीत राज्यासमोर कोणत्या समस्या आहेत. त्याचबरोबर निवडणुकीबद्दलची रणनीती आणि नागपूरमध्ये होणाऱ्या महाविकास आघाडीच्या सभेच्या तयारीबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल”, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.
नागपूरच्या महाविकास आघाडीच्या सभेला राहुल गांधी येणार?
बाळासाहेब थोरात यावेळी असंही म्हणाले की, “सावरकर आणि अदाणी मुद्द्यावर महाविकास आघाडीतील पक्षाची आधीच चर्चा झाली आहे. नागपूर येथील महाविकास आघाडीच्या सभेत राहुल गांधी येणार की नाही, याबद्दल अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यांचा कार्यक्रम निश्चित झाला की, त्याबद्दल कळेल”, असं थोरात यांनी सांगितलं.
काँग्रेसची ठाण्यातील गडकरी रंगायतन मध्ये बैठक
ठाण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत अदाणी महाघोटाळ्यासंदर्भात ठराव मांडला जाणार आहे. हा मुद्दा उचलून धरून जनतेसमोर नेण्यासाठी जय भारत सत्याग्रह सुरू करण्याची काँग्रेसची भूमिका. त्याची सुरूवात ठाण्यातून करणार. त्याचबरोबर अवकाळी पावसाने पिकांचं नुकसान झालं असून, यासंदर्भात पाहणी दौरा करणार. यासाठी काँग्रेस नेत्यांची समिती तयार केली जाणार असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
