मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एका महिलेने छळ आणि आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा आरोप केल्यानंतर हे प्रकरण राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नावही समोर आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचे पत्रकार तुषार खरात यांच्याशी फोनवर संभाषण झाल्याचा दावा केला होता.
ADVERTISEMENT
तुषार खरात हे एका यूट्यूब चॅनलचे संपादक असून, त्यांनी या प्रकरणाशी संबंधित व्हिडीओ प्रसिद्ध केले होते. मात्र, सुप्रिया सुळे यांनी तुषार खरात यांना नेमके किती वेळा कॉल केला होता, यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
फडणवीसांनी विधानसभेत काय आरोप केले?
फडणवीस यांनी विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे तुषार खरात यांच्याशी कॉल रेकॉर्ड्स आढळले आहेत असं म्हटलं आहे. तुषार खरात यांनी आपल्या चॅनलवर जयकुमार गोरे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर माहिती प्रसिद्ध केली होती, आणि याच संदर्भात त्यांनी काही व्हिडिओ हे सुप्रिया सुळे यांना पाठवले होते. यावरूनच थेट मुख्यमंत्र्यांनी रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले, "सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे तुषार खरात यांच्याशी कॉल्स झाले आहेत. जयकुमार गोरे यांच्याविरोधात तयार करण्यात आलेले व्हिडीओ या दोघांना पाठवण्यात आले होते. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल."
या प्रकरणात तुषार खरात यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. त्यांना खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यासह दोन अन्य आरोपी ताब्यात आहेत. जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेने हे प्रकरण मिटवण्यासाठी 3 कोटी रुपयांची मागणी केल्याचा दावा पोलिसांनी केला. त्यानंतर या महिलेला 1 कोटी रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आलं.
या घटनेनंतर सुप्रिया सुळे यांनी सरकारवर संशय व्यक्त केला होता. त्या म्हणाल्या, "नोटबंदीनंतर 1 कोटी रुपये रोख कुठून आले? हा सरकारचा खोटा खेळ असू शकतो." मात्र, तुषार खरात यांच्याशी झालेल्या कॉल्सबाबत त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, मुख्यमंत्र्यांनी केलेले आरोप हे चुकीचे आहेत.
फडणवीसांचे आरोप आणि सुप्रिया सुळेंचं उत्तर
फडणवीसांनी केलेल्या आरोपानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या, "देवेंद्र फडणवीस यांनी माझे नाव घेतले, मला आश्चर्य वाटले. हा मुद्दा कुठून आला? मी तुषार खरात यांना ओळखते, पण या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. त्यांनी माझी मुलाखत घेतली होती लोकसभा निवडणुकीच्या काळात. त्यामुळे मी त्यांना ओळखते. जयकुमार गोरेंप्रकरणी त्यांनी मला काही व्हिडिओ पाठवले होते. पण ते मी कोणालाही फॉरवर्ड केलेले नाही. जर फडणवीसांना या प्रकरणाचा तपास करायचा असेल, तर मी पूर्णपणे सहभागी होण्यास तयार आहे.'
'पण मला एक प्रश्न आहे - ज्यांनी 1 कोटी रुपये रोख दिले गेले, ते पैसे कुठून आले? नोटबंदीनंतर इतकी मोठी रक्कम रोख स्वरूपात कशी आली? याचे उत्तर सरकारने द्यावे. याबाबत मी आधीही बोलले होते आणि आता देखील बोलत आहे.'
त्यांनी पुढे असा संशय व्यक्त केला की, 'हे प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित असू शकते. हा सगळा खोटा खेळ असू शकतो. फडणवीसांनी माझे नाव घेऊन आरोप केले, पण त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते समोर आणावेत. मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे."
दुसरीकडे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे की, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देण्यासाठी तुषार खरात यांच्याशी संपर्क साधला असावा.
या प्रकरणाने राजकीय वातावरण तापले असून, सुप्रिया सुळे यांनी तुषार खरात यांना किती वेळा आणि का कॉल केला? असे सवाल विचारले जात आहेत. पण असे काही कॉल्स झाले की नाही याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही.
ADVERTISEMENT
