NCP MLA Jitendra Awhad on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची, याचा फैसला केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कोर्टात आहे. सध्या आयोगात सुनावणी सुरू असून, दोन्ही गट पक्षावर दावे करताना दिसत आहे. यातच आता दोन्ही गटातील नेते एकमेकांवर तुटून पडताना दिसत आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांच्यावर अजित पवार गटाकडून टीका करण्यात आली. तो मुद्दा नेमका काय आणि त्यावर आव्हाडांनी काय खुलासा केला, हे समजून घेणं महत्त्वाचं ठरतं.
ADVERTISEMENT
अजित पवार गटाने जितेंद्र आव्हाडांवर टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विस्तारात अजित पवारांचं योगदान काय? असे विधान आव्हाडांनी केंद्रीय निवडणूक आयोगातील सुनावणीनंतर केले. त्यावर अजित पवार गटाने बोट ठेवलं. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी आव्हाडांवर निशाणा साधला.
अजित पवार गटाने आव्हाडांवर नेमकी काय केली टीका?
सूरज चव्हाण म्हणाले की, ‘अजित पवार, शरद पवारांनी तुम्हाला वैद्यकीय शिक्षण कॅबिनेट मंत्रिपद दिलं. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृह निर्माणसारखे मोठे खाते दिले. तुम्हाला इतके दिले, पण ठाणे, पालघर जिल्ह्यात तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोक राष्ट्रवादी सोडून गेले आणि तुमचे राष्ट्रवादीसाठी किती योगदान आहे, हे महाराष्ट्राला माहिती आहे.’
“ते मी बोललो नाही”, आव्हाडांनी काय केला खुलासा?
जितेंद्र आव्हाडांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. “मागील एका सुनावणीत अजित पवार गटाच्या वकिलांनी शरदचंद्र पवारसाहेब हे उपस्थित असताना ते पक्षात हुकूमशहासारखे वागत असून पक्षात लोकशाही नसल्याचा आरोप केला होता. या आरोपावर आम्ही लगेच बाहेर येऊन माध्यमांसमोर या आरोपांचे खंडन करून सत्य वस्तुस्थिती जाहीरपणे सांगितली होती.”
हेही वाचा >> Lok Sabha : महायुतीचा फॉर्म्युला ठरला! फडणवीसांनी सांगितलं शिंदे-पवारांना किती जागा?
“नुकत्याच झालेल्या निवडणूक आयोगातील सुनावणीत आमचे वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना , ‘अजित पवार यांनी संघटनेत कधीच पद घेतले नव्हते. ते कायम सत्तेच्या वर्तुळात राहिले. सत्ता मिळत नसल्यास ते दुसरीकडे झुकले, हा इतिहास आहे. सन 2019 आणि 2023 मध्येही त्यांची अशीच वर्तणूक होती. 2019 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेतही त्यांनी पक्षावर दावा केला होता; म्हणजेच त्यांची वागणूक ही सत्तेकडेच वळणारी आहे’, असे सविस्तर सांगितले.”
“त्यावर शरद पवार विरोधी गटाने बाहेर येऊन कामत यांचे म्हणणे खोडून काढले नाही. जसे शरद पवार साहेबांवरील हुकूमशहाचे आरोप आम्ही तत्काळ खोडून काढले. तसे या विरोधकांनी केले नाही. त्यानंतर आता माझ्यावर टीका करण्यात येत आहे. वास्तविक पाहता, हे मुद्दे देवदत्त कामत यांनी मांडलेले आहेत. मी कुठेही अजितदादांचे पक्षासाठी योगदान नाही असे मी म्हटले नाही”, असा खुलासा आव्हाडांनी केला आहे.
हेही वाचा >> ‘तुम्ही मंडल बरोबर नव्हता तर कमंडल बरोबर…’, प्रकाश आंबेडकरांनी साधला निशाणा
अजित पवार गटाला आव्हाडांनी काय दिले उत्तर?
“मला पक्षातील पदे आणि मंत्रिपद हे फक्त शरद पवारसाहेबांमुळेच मिळालेले आहे. माझी 100 टक्के निष्ठा ही पवारसाहेबांप्रतीच आहे. त्यामुळेच पवारसाहेबांनी मला ही पदे दिली असल्याचे मी जाहीरपणे आणि छातीठोकपणे कबूल करीत असतो. मला पवारसाहेबांपर्यंत सुरेश कलमाडी आणि डॉ. पद्मसिंह पाटील यांनीच नेले होते, हेही मी सांगत असतो; मी खोटं बोलत नाही. उगाच बातम्यांमध्ये येण्यासाठी खोटे आणि चुकीचे बाईट देऊ नका. सत्यापासून दूर जाणारा मी नाही. मला मदत करणाऱ्यांचे उपकार मी आयुष्यभर विसरत नाही”, असं उत्तर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवार गटाला दिले आहे.
ADVERTISEMENT