‘बीआरएसचा फटका ‘मविआ’लाच बसणार’, सुनील तटकरेंनी मतदारसंघातीलच दिलं उदाहरण

भागवत हिरेकर

28 Jun 2023 (अपडेटेड: 28 Jun 2023, 10:25 AM)

केसीआर यांनी सुरूवातीला महाराष्ट्राच्या सीमाभागात दौरे केल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षाची वाट धरलीये आणि त्यामुळेच बीआरएसचा फटका महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत बसू शकतो, असं म्हटलं जात आहे.

How will brs will change of maharashtra politics?, sunil tatkare explain his stand

How will brs will change of maharashtra politics?, sunil tatkare explain his stand

follow google news

Maharashtra Political Situation Now : के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने विधानसभा निवडणुकीची जोरात तयारी सुरू केली आहे. केसीआर यांनी सुरूवातीला महाराष्ट्राच्या सीमाभागात दौरे केल्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्या पक्षाची वाट धरलीये आणि त्यामुळेच बीआरएसचा फटका महाविकास आघाडीला आगामी निवडणुकीत बसू शकतो, असं म्हटलं जात आहे. याला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनीच दुजोरा दिला आहे.

हे वाचलं का?

बारामती येथे बोलताना सुनील तटकरे म्हणाले, “बीआरएस किंवा वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे येणारी मते ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधातील मतदारांचा कौल असतो. या मतात फूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय जनता पार्टीला पडणारी मते ठरलेली असतात. धर्मनिरपेक्ष विचारांची मते ही ठरलेली असतात. त्यामुळे बीआरएस आणि वंचित बहुजन आघाडी या शक्तींचा महाराष्ट्रात होत असलेला प्रवेश त्रासदायक आहे.”

हेही वाचा >> BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?

पुढे बोलताना तटकरे यांनी 2019 मधील राजकीय स्थितीचाही दाखला दिला. ते म्हणाले, “2019 च्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात पराभूत झालेत. विधानसभेत त्याचा परिणाम झाला नाही, पण नवीन शक्तींमुळे नवीन ध्रुवीकरण ज्यावेळी होईल, त्याचा परिणाम धर्मनिरपेक्ष मतांच्या ध्रुवीकरणांमध्ये होऊ शकतो. मात्र महाविकास आघाडी आणि घटक पक्ष याबाबत विचार करतील.”

मतांमध्ये विभाजन म्हणजे भाजपला मदत

सुनील तटकरे असंही म्हणाले की, “2019 च्या मतदानाची आकडेवारी जर काढली तर माझ्या मतदारसंघात बहुजन वंचित आघाडीला लक्षणीय मतं मिळाली होती. ते उमेदवार उभे राहिले नसते, तर माझं मताधिक्य लाखापेक्षा जास्त मतांनी वाढल असतं. आज धर्मनिरपेक्ष विचारांच्या मतांमध्ये विभाजन होणे म्हणजे भाजपाला मदत करणं हे सरळ सूत्र आहे”, असं विश्लेषण तटकरे यांनी बीआरएसच्या बाबतीत बोलताना केलं.

हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?

“समान नागरी कायद्यावर शरद पवार बोलतील”

यूनिफॉर्म सिव्हील कोड अर्थात समान नागरी कायद्याबद्दल बोलणं तटकरेंनी टाळलं. ते म्हणाले, “समान नागरी कायद्याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका शरद पवार आणि अजित पवार मांडतील. सरकार आल्यानंतर नवनवी धोरणं राबवले जातात. 370 सारखं कलम हटवण्याचा निर्णय सरकारने घेतला अजूनही काही महत्त्वाचे निर्णय घेतले आमची एकच भूमिका आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे लिहिलंय त्यानुसार अंमलबजावणी केली जावी. समान नागरी कायद्याबाबत पक्षाचे अधिकृत भूमिका पवार साहेब मांडतील”, असं सुनील तटकरेंनी सांगितलं.

हेही वाचा >> NCP: भाकरी फिरवली अन् अजित पवारांचा फोटो गायब, शरद पवारांच्या मनात काय?

राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष बदलणार?

“अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचा कणा आहेत. संबंध महाराष्ट्रात गेल्या पंचवीस वर्षात पक्ष उभारणीत त्यांचे योगदान मोठे आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी भावना व्यक्त केली आहे. मात्र त्याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. उद्याच्या राजकारणात पक्षाची आव्हानात्मक स्थितीत होणारी वाटचाल, याबाबतची त्यांची भावना त्यांनी स्पष्टपणे मांडली”, असंही तटकरे म्हणाले.

    follow whatsapp