Ajit Pawar: नवी दिल्ली: महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याबाबत सस्पेन्स अजूनही कायम आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. बुधवारी एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर हे स्पष्ट झालं की, मुख्यमंत्री भाजपचाच होणार. आता फक्त नावावर शिक्कामोर्तब करणे बाकी आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्लीतील घरी आज रात्री यासंदर्भात महत्त्वाची बैठक झाली. पण याच बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये सर्वाधिक फायदा हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा होत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT
अमित शाह यांच्या निवासस्थानी जी बैठक पार पडली त्यामध्ये महायुतीचे तीनही नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. ही बैठक सुमारे 2 तास चालली. दरम्यान, त्याआधी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी अमित शहा यांची त्यांच्या घरी भेट घेतली होती. जिथे दोघांमध्ये तासभर चर्चा झाली.
हे ही वाचा>> Maharashtra CM: फडणवीसांच्या चेहऱ्यावर हास्य, एकनाथ शिंदे मात्र... 'त्या' फोटोने सगळंच केलं क्लिअर?
अमित शाह यांच्या बैठकीत अजित पवारांबाबत नेमकं काय ठरलं?
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असल्याने ते आता उपमुख्यमंत्री पद घेणार की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, दुसरीकडे अजित पवार हे मात्र पुन्हा उपमुख्यमंत्री पदी विराजमान होऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत काही गोष्टी निश्चित झाल्या असल्याचं समजतं आहे. त्यामुध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद आणि अर्थखातं पुन्हा देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे. याशिवाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांना केंद्रीय मंत्रिपद देखील देण्यात येईल अशी चर्चा झाल्याचं समजतं आहे.
हे ही वाचा>> 'पवार साहेब कायमस्वरुपी घरी बसा, अनेक लोकांचं वाटोळं केलंय', भाजपच्या बड्या नेत्याकडून हल्लाबोल
या बैठकीचं फलित पाहिल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक प्रकारे ही लॉटरीच म्हणावी लागेल. कारण कोणतीही अधिक घासाघीस न करता त्यांच्या वाट्याला उपमुख्यमंत्री पद, अर्थखातं तसेच केंद्रात एक मंत्रिपद मिळू शकतं. त्यामुळे शिंदेंच्या तुलनेत अजित पवारांसाठी आजची बैठक ही अधिक महत्त्वाची ठरली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत नेमकं काय ठरलं?
- शिंदे गटाच्या एका खासदाराला केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता
- शिंदेंच्या शिवसेनेला नगरविकास खातं, PWD खातं दिलं जाण्याची शक्यता
- अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद, अर्थखातं दिलं जाईल
- प्रफुल पटेलांना केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता
- भाजपकडे महसूल आणि गृहखातं राहील
- महायुतीच्या मंत्रिमंडळात ओबीसींनी प्रतिनिधीत्व दिलं जाईल
- महायुतीत एकनाथ शिंदेंचा सन्मान राखला जाईल
- पुढील दोन दिवसात भाजपच्या नेत्याची निवड केली जाईल
- मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत काय झाले?
या गोष्टी बैठकीत ठरल्या असल्याचा माहिती ही सूत्रांकडून मिळाली आहे. ज्याबाबत येत्या दोन दिवसात नेमका निर्णय जाहीर केला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री पदाबाबत आतापर्यंत नेमकं काय-काय ठरलं?
महाराष्ट्रातील निवडणूक निकालाला चार दिवस उलटले तरी महायुतीला आपला मुख्यमंत्री निवडता आलेला नाही. तीन नावे शर्यतीत होती, मात्र अजित पवार यांनी आधीच माघार घेतली आहे. आणि एकनाथ शिंदे यांनीही शर्यतीतून बाहेर पडल्याचे संकेत दिले आहेत. भाजपचे मुख्यमंत्रिपद आपल्याला मान्य असून भाजप नेतृत्व जो काही निर्णय घेईल, त्याचे पालन करू, असे विधान त्यांनी बुधवारी केले होते.
दुसरीकडे भाजप नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सकारात्मक असल्याचं समजतं आहे. मात्र असं असलं तरीही त्यांच्याकडून कोणतीही अधिकृत घोषणा ही करण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रात भाजपचा ऐतिहासिक विजय
नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने 230 जागा जिंकून नेत्रदीपक विजय नोंदवला. लोकसभा निवडणुकीतील पराभवातून सावरत भाजपने 132 मतदारसंघ काबीज केले, जे महायुतीच्या सर्व घटकांपैकी सर्वाधिक आहेत. शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही चांगली कामगिरी केली. शिवसेनेने (शिंदे) 57 तर राष्ट्रवादीने (अजित पवार) 41 जागा जिंकल्या.
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला (एमव्हीए) मोठा धक्का बसला. त्यांना फक्त 16 जागा मिळाल्या. याशिवाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (एसपी) फक्त 10 जागा मिळाल्या, तर उद्धव ठाकरेंच्या (यूबीटी) 20 जागा जिंकल्या. 20 नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर झाला.
ADVERTISEMENT