Nagesh Patil Ashtikar Pradnya Satav : (ज्ञानेश्वर पाटील, हिंगोली) लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांची थेट काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार केली आहे. सातव यांच्यावर कारवाई करण्याची मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे. (MP Nagesh Patil Ashtikar has Wrote letter to congress for action against Pragya Satav)
ADVERTISEMENT
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नागेश पाटील आष्टीकर काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल यांना पत्र पाठवले आहे. या पत्रात नागेश पाटील आष्टीकर यांनी प्रज्ञा सातव यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
प्रज्ञा सातवांनी वंचित बहुजन आघाडी, महायुतीला पाठिंबा दिला
नागेश पाटील आष्टीकर यांनी असा आरोप केला आहे की, कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून येत असलेल्या प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या हिताच्या विरोधात काम केले. त्यांनी पक्षाचे निर्देश पाळले नाहीत आणि विरोधकांना पाठिंबा दिला.
हेही वाचा >> पवारांनी टाकला मोठा डाव, अजित पवारांच्या आमदारांशी गुपचूप भेट; नेमकं काय घडलं?
आष्टीकरणांनी पत्रात म्हटले आहे की, प्रज्ञा सातव यांनी वंचित बहुजन आघाडी आणि महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यांच्या या कृतीमुळे पक्षाचे कार्यकर्ते आणि आपल्या समर्थकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. प्रचारादरम्यान, त्या कोणत्याही सभेत सहभागी झाल्या नाहीत.
प्रचारादरम्यान प्रज्ञा सातव यांच्या वर्तनाची चौकशी करण्यात यावी आणि महाराष्ट्रात इंडिया आघाडी एकसंध राहावी म्हणून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागेश पाटील आष्टीकर यांनी केली आहे.
हेही वाचा >> अजित पवारांवर आधी टीका केली, आता फडणवीसांकडे संरक्षणाची मागणी?
प्रज्ञा सातव या माजी खासदार स्व. राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसने त्यांना विधान परिषदेतून आमदारकी दिली होती. त्यांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपला असून, काँग्रेसकडून पुन्हा संधी मिळणार का, अशी चर्चा सुरू आहे. त्यातच ठाकरेंच्या शिवसेनेकडून त्यांच्याबद्दल कारवाईची मागणी झाली आहे. त्यामुळे प्रज्ञा सातव पक्षाकडे काय भूमिका मांडणार, हेही महत्त्वाचे आहे.
हिंगोली लोकसभा जागेसाठी सातव होत्या आग्रही
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी वेगवेगळ्या जागांची मागणी केली होती. यात हिंगोलीची जागाही होती. प्रज्ञा सातव यांनी हिंगोली लोकसभेची जागा काँग्रेसने लढवावी, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेला मिळाली.
ADVERTISEMENT