ठाणे: ठाकरे गटातील महिला कार्यकर्ता रोशनी शिंदे यांच्या मारहाण प्रकरणाला नवं मिळालं आहे. रोशनी शिंदे यांच्या जिवाला धोका असून, त्यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी शिवसेनेच्या शिंदे गटाने केली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गंभीर आरोप शिवसेना महिला आघाडीच्या ठाणे जिल्हाप्रमुख मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाने ठाण्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या महिला कार्यकर्त्याला शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या महिलांनी मारहाण केली. या महिलेला उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे.
हेही वाचा >> ‘बावन’ आणे, कमळबाई आणि शिंदेंचे शाप; शिवसेनेचा (UBT) भाजपवर घणाघात
दरम्यान, ठाकरे गट आणि शिवसेनेत यावरून घमासान सुरू असतानाच आता शिवसेनेच्या मिक्षानी शिंदे यांनी रोशनी शिंदे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. मिनाक्षी शिंदे यांनी ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांना तसे पत्र दिले आहे.
उद्धव ठाकरे, जितेंद्र आव्हाडांचा उल्लेख, पत्रात काय म्हटलंय?
मिनाक्षी शिंदे यांनी पत्रात म्हटलं आहे की, “दोन दिवसांपासून ठाण्यात रोशनी शिंदे पवार या महिलेवरून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून, त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेत्यांकडून होत आहे.”
“रोशनी शिंदे पवार, या महिलेला ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलमधून वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्यानंतरही या लोकांनी संपदा हॉस्पिटलमध्ये जबरदस्ती भरती केले. तेथील डॉ. उमेश आलेगांवकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सदरच्या महिलेची सोनोग्राफी केली असता, त्या गर्भवती नाहीत व इतर रिपोर्टनुसार त्यांना कुठल्याही प्रकारच्या अंतर्गत जखमा, फॅक्चर, मारहाण झालेली नाही, असं सांगितलं. सिव्हिल रुग्णालयानेही बाह्य स्वरूपाची जखम नाही, असं प्रमाणपत्र दिले आहे”, असं मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मारहाणीचे आरोप करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न -मिनाक्षी शिंदे
पत्रात पुढे म्हटलं आहे की, “दोन दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते आणि राष्ट्रवादीचे नेते सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेला लाथा बुक्क्यांनी मारहाण आणि तिच्या जीवाला धोका असल्याचा आरोप करत आहेत. मारहाणीच्या आरोपाखाली सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलीस प्रशासनावरही चुकीचे आरोप करीत आहेत. राजकारणासाठी निंदनीय कृत्य निषेधात्मक आहे”, असं मिक्षानी शिंदेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा >> “ठाण्यातून लढणार अन् जिंकूनही येणार!” शिंदेंच्या बालेकिल्ल्यातूनच ठाकरेंनी दिलं आव्हान
“जाहीर सभेत न झालेल्या मारहाणीच्या आरोपांचा उपयोग करून जहाल भाषणबाजी करून सहानुभूती घेण्याचा प्रयत्न केला गेला. राजकारणासाठी रोशनी शिंदे या महिलेचा वापर हा गट करीत आहे. संपदा हॉस्पिटलमधून डिस्चार्च दिल्यानंतर या राजकीय मंडळींनी तिला लिलावती रुग्णालयात दाखल केल्याचे समजते.”
“या सर्व प्रकारावरून हे सिद्ध होत आहे की, रोशनी शिंदे या महिलेचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड हे राजकारणासाठी सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करीत आहेत”, असा आरोप मिक्षानी शिंदेंनी केला आहे.
“संरक्षण देऊन तिच्या जीवाची काळजी घ्या”
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोमाने काम करीत आहेत. त्यांना कामाद्वारे उत्तर देता येत नसल्याने अशा प्रकारे निंदनीय घटनांचा उपयोग सदरची विरोधक मंडळी करीत आहे”, असा आरोप मिनाक्षी शिंदे यांनी केला आहे.
“आम्हाला सदर महिलेच्या जीवाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धोका आहे, असं वाटते. महिलेला डिस्चार्ज दिला गेला, तसेच महिला व्यवस्थित बोलत असल्याचं दिसत आहे, तरीही तिला लिलावती रुग्णालयात दाखल केलं आहे.”
“राजकारणासाठी सदर महिलेचा हे लोक जीवही घेऊ शकतात, जेणेकरून त्यांना त्याचा दोष आमच्यावर टाकता येईल. राजकारणासाठी कुठल्याही थराला ही मंडळी जाऊ शकतात, असाही आम्हाला दाट संशय आहे. तरी सदर महिलेस पोलीस संरक्षण देऊन तिच्या जीवाची त्यांच्यापासून काळजी घ्यावी,” अशी मागणी मिनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
ADVERTISEMENT