Ashok Chavan Ram Mandir Inauguration banner : कुवरचंद मंडले, नांदेड : संपूर्ण देशवासियांना उद्या 22 जानेवारीला सोमवारी अयोध्येत होणाऱ्या राममंदिर (Ram Mandir) सोहळ्याची उत्सुकता लागली आहे. यानिमित्त अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात या सोहळ्यानिमित्त बॅनरबाजी किंवा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण नाकारले असले तरी, दुसरीकडे नांदेडमध्ये अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे ‘रघुपती राघव राजाराम’ असे लिहलेले बॅनर शहरभर झळकले आहेत. या बॅनवर झळकलेल्या मजकूरावर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. (ram mandir inauguration banner ashok chavan nanded not display party name and designation bjp join speculation maharashtra politics)
ADVERTISEMENT
गेल्या काही दिवसांपासून अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यातच अशोक चव्हाणांची आजची बॅनरबाजी पाहून या चर्चांना आणखीणच बळ मिळत आहे. एरव्ही सत्य साईबाबांचे भक्त असलेले चव्हाण फारसे देव धर्माच्या बाबतीत फारसे सक्रिय नसतात. मात्र अयोध्येच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्यांनी केलेली बॅनरबाजी राजकारणात उलथापालथ घडवणारी ठरते की काय ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे ही वाचा : “यात उद्धवजींचा काही दोष नाही”, चित्रा वाघ यांनी राऊतांकडे मागितला पुरावा
दरम्यान काही दिवसांपूर्वीच भाजप नेते गिरीश महाजन यांनी 15 दिवसात राजकीय भूकंप होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अशोक चव्हाण यांच्याकडून कोणत्याही पदाच्या उल्लेखाशिवाय बॅनर झळकल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.
चव्हाणांच्या बॅनरबाजीत काय?
अशोक चव्हाण यांच्याकडून नांदेडमध्ये बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरमध्ये प्रभू श्रीरामाचा फोटो आहे. तर, त्यासोबत ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम, ईश्वर अल्लाह तेरो नाम, सबको सन्मती दे भगवान’ या महात्मा गांधी यांच्या भजनातील ओळी नमूद करण्यात आल्या आहेत. तर, बॅनरवर अशोक शंकरराव चव्हाण हे एकमेव नाव नमूद करण्यात आले आहे. या नावाखाली कोणत्याही पदाचा उल्लेख नाही. अशोक चव्हाण हे राज्याचे माजी मुख्यमंत्री असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते देखील आहेत. त्यामुळे त्यांच्या नावानंतर कोणत्याही पदाचा उल्लेख नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
हे ही वाचा : Ram Mandir : 22 जानेवारीच्या सुट्टीबद्दल उच्च न्यायालयाने दिला निकाल, कोर्टात काय झालं?
राज्यात ठिकठिकाणी रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा निमित्ताने शुभेच्छा देणारे बॅनर झळकावले जात आहेत. या बॅनरवर नेत्यांची आणि स्थानिक कार्यकर्त्यांची गर्दी सर्वाधिक दिसते. तर, त्या तुलनेत अशोक चव्हाण यांच्या बॅनरवर प्रभू राम वगळता इतर कोणाचाही फोटो नाही. त्यामुळेही अशोक चव्हाण यांच्या बॅनरची शहरात चर्चा सुरू आहे.
ADVERTISEMENT