महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा पुन्हा एकदा वाढला आहे. निमित्त ठरलं आहे उद्धव ठाकरेंनी फडतूस म्हणून देवेंद्र फडणवीसांवर केलेली टीका. ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपने ठाकरेंवर हल्लाच चढवला. देवेंद्र फडणवीसांनी मी काडतूस आहे, असं म्हणत इशारा दिला. आता यावरूनच खासदार संजय राऊतांनी फडणवीसांवर पलटवार केला. यावेळी राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही डिवचलं.
ADVERTISEMENT
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले,”आम्ही कुणाला झुका, वाका म्हणालो नाही. हे एवढे वाकलेले आहेत की, वाकून मोडून पडलेत. आमच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या टोळीतील गुंडांनी, डॉ. मिंधे यांच्या टोळीतील गुंडांनी ज्या प्रकारे हल्ला केला. एका महिलेवर निर्घृण अमानुष, ती महिला जखमी झाली. रात्री तब्येत बघिडली म्हणून लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं.”
“रोशनी शिंदे यांना पाहण्यासाठी उद्धव ठाकरे ठाण्यात गेले होते. आदित्य ठाकरे, रश्मी वहिनीही गेल्या. त्या महिलेवरील हल्ल्याचं कारण काय? त्या महिलेच्या पोटावर लाथा मारता आणि म्हणता हात लावला नाही. त्या महिलेवर मातृत्वाचे उपचार सुरू आहेत. ती म्हणत होती की, माझ्या पोटावर लाथा मारू नका. तरीही पोलीस काही करत नव्हते. गुंडांच्या टोळ्या मारत होत्या. हे सगळं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे”, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
फडतूस शब्दाचा अरथ काय? संजय राऊत म्हणाले, ‘शब्दकोश बघा’
यावेळी राऊतांनी फडतूस शब्दाचा अर्थही सांगितला. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंनी अत्यंत सौम्य शब्द वापरला फडतूस. फडतूसचा अर्थ नागपुरात वेगळा असेल. आम्ही नागपूरचे आहोत, मग आम्ही कुठले आहोत? आम्ही महाराष्ट्रातील आहोत आणि महाराष्ट्रातच नागपूर आहे. नागपूर वेगळं नाही, वेगळं होऊ देणार नाही. फडतूस हा शब्द मराठी भाषेतील प्रचलित शब्द आहे.”
हेही वाचा – ‘Devendra Fadnavis फडतूस गृहमंत्री’ : उद्धव ठाकरेंचा चढला पारा; थेट राजीनाम्याची मागणी
“शब्दकोशात फडतूसचा अर्थ अर्थहीन, किंमत नसलेला, बिनकामाचा असा आहे. आपण अनेकदा बिनकामाचे लोक असं म्हणतो. हे सरकारच बिनकामाचं आहे. त्याला फडतूस शब्द वापरला. त्यामध्ये भिजलेलं काडतूस आतमध्ये जायचं कारण नाही. तुम्ही काडतूस असाल. अशी भिजलेले काडतूस महाराष्ट्रात खूप पाहिले. भिजलेले काडतूसं उडत नाही. तुमचं खरं काडतूस सीबीआय आणि ईडी आहे. म्हणून तुमची मस्ती आणि चरबी आहे”, असं म्हणत राऊतांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
‘महाराष्ट्राला तुमची अडचण झाली आहे’, राऊत फडणवीसांना काय म्हणाले?
फडणवीसांवर टीका करताना खासदार राऊत म्हणाले, “ईडी आणि सीबीआय बाजूला ठेवून या, मग काडतूस कुठे घुसत ते आम्ही दाखवतो. फडतूस का म्हणाले? रोशनी शिंदेंवर झालेला हल्ला महाराष्ट्राने पाहिला. हे गृहमंत्री आहेत ना, मुख्यमंत्री आहेत ना. जे म्हणताहेत की, गृहमंत्री झाल्याची अडचण… अडचणच आहे महाराष्ट्राला तुमची. आम्हाला नाही. मंत्रालयासमोर तीन जणांनी आत्महत्या केल्या. ही तुमची मर्दानगी. महिला आत्महत्या करताहेत आणि तुम्हाला कानोकान खबर नाही, तुम्हाला काय म्हणावं?”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
“तुम्ही आम्हाला धमक्या देता. आम्ही फाटके लोक आहोत. काय करणार तुम्ही? ईडी, सीबीआयचे बॉडीगार्ड घेऊन येणार. काढा बाजूला मग आम्ही काडतूसं दाखवतो. आमचा बाण तुम्ही घेतला, तरी तो घुसला ना. महाराष्ट्रातील परंपरा, संस्कृती या लोकांनी मोडून काढली”, असं संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले.
बावनकुळे, तुम्हाला घराबाहेर का पडू दिलं नव्हतं? संजय राऊतांनी दिला इशारा
उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यावर संजय राऊत म्हणाले, “कोण बावनकुळे? त्यांना विचारा की, 2019 मध्ये तुमचं तिकीट कुणी कापलं होतं? भाजपच्या हायकमांडनेच तुम्हाला घराबाहेर का पडू दिलं नव्हतं? सांगा. नाहीतर आम्ही सांगतो, तुम्हाला का घराबाहेर पडू दिलं नव्हतं ते. तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार केला होता, जो दिल्लीपर्यंत गेला. म्हणून तुम्हाला घराबाहेर पडू दिलं नव्हतं”, असा सवाल राऊतांनी केला.
संबंधित बातमी – “… त्याला जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही”; ठाकरेंवर फडणवीसांचा पलटवार
संजय राऊत पुढे असेही म्हणाले, “तुम्हाला आणि तुमच्या पत्नीलाही तिकीट दिलं नव्हतं. त्यावर तुम्ही खुलासा करा. तुम्ही वीज खात्यात काय लूट केली होती, हे आम्ही बोलायला गेलो, तर तुमचं कठीण होईल. आम्ही मर्यादा सांभाळल्या आहेत. शिवसेनेला धमक्या देऊ नका. तुमचं टांगावरचं फिरणं आहे ना, टांगा सांभाळा”, असा इशारा त्यांनी दिला.
ADVERTISEMENT