Sanjay Raut on Sharad pawar Ajit Pawar Meeting : शरद पवार अजित पवार पुण्यात भेटले. या भेटीची वेगवेगळी कारणे चर्चिली जात आहेत. पण, खासदार संजय राऊत यांनी या भेटीमागचं वेगळंच कारण सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केल्यानंतर अजित पवार आणखी काही गोष्टींवर दाव्या करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत राऊतांनी रोखठोक लेखातून दिले आहेत. यापूर्वी संजय राऊतांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा गट भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही असल्याचे लिहिले होते. ते नंतर खरं ठरलं. त्यामुळे नव्या लिहिलेल्या लेखाचीही चर्चा सुरू झालीये. या लेखात संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबद्दलही सूचक भाष्य केले आहे.
ADVERTISEMENT
संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले आहे की, “पवार पुन: पुन्हा चर्चेत येत आहेत ते अजित पवार यांच्याशी सुरू असलेल्या बैठकांमुळे. अजित पवार यांनी पवारांशी राजकीय नाते तोडले. अजित पवार हे आज राजकारणातले बलवान नेते आहेत; पण सत्तेची गदा व शरद पवार यांचे नाव त्यांच्या पाठीशी नसेल तर अजित पवार कोण, हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल.”
“शरद पवार व अजित पवार का भेटत आहेत? माझ्या माहितीनुसार या बैठका राजकीय नाहीत; तर शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानपासून कृषी, शेती, सहकारासंदर्भात ज्या संस्थांचे मोठे जाळे निर्माण केले त्या सर्व संस्थांवर अजित पवार यांना पवारांनी आणले. हजारो शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थ्यांचे भविष्य या संस्थांत आहे. संस्थांचे भवितव्य काय हे ठरवण्यासाठी या बैठका असाव्यात”, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
अजित पवार संस्था घेणार ताब्यात?
“महाराष्ट्राच्या सगळ्यात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या चेअरमनपदी शरद पवार, तर संचालक म्हणून अजित पवार आहेत. असे त्रांगडे अनेक संस्थांत आहे. या संस्थांचा वेलू गगनावर नेण्याचे काम शरद पवार यांनी केले. त्या वेलूवर आज जे लटकत उभे आहेत त्यांनी त्यांची पदे सोडून स्वत:च्या नव्या संस्था निर्माण करण्याचे राजकीय औदार्य दाखवायला हवे. पण शेवटी हा पवारांच्या कुटुंबातला अंतर्गत प्रश्न आहे. जेथे शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवरच अजित पवार दावा सांगत आहेत व पवारांच्या हयातीत त्यांच्या पक्षावर स्वामित्व सांगितले गेले, तेथे संस्थांच्या हक्कांवर काय बोलायचे?”, असे म्हणत अजित पवारांकडून संस्था ताब्यात घेण्याचे प्रयत्न होत असल्याचे अप्रत्यक्षपणे राऊतांनी म्हटलं आहे.
वाचा >> NCP Crisis : अजित पवारांना मिळणार घड्याळ चिन्ह? शरद पवार तसे का बोलले?
“बाळासाहेब ठाकरे यांनी पवारांवर उत्तम व्यंगचित्र काढले. एकदा महाराष्ट्राच्या राजकारणातील नेत्यांना विविध पक्ष्यांच्या रूपात त्यांनी चितारले. पवार यांना खुर्चीला भोके पाडणाऱ्या सुतार पक्ष्याची उपमा दिली. शरद पवार ‘सुतार पक्षी’ चोच टोकदार नसताना खुर्चीला भोके पाडतो’ असे त्यांनी चित्रात दाखवले. पवारांच्या राजकारणावरचे हे मार्मिक भाष्य होते. तब्बल 40-45 वर्षांनंतर अजित पवार हे सुतार पक्ष्याच्या रूपात दिसत आहेत व पवारांच्या पक्षाला भोके पाडून ते निघून गेले. भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचा वापर करून शरद पवार यांचे महाराष्ट्रातील नेतृत्वाचे युग संपवण्याचे प्रयत्न चालवले आहेत”, असे भाष्य संजय राऊतांनी सध्या घडामोडींबद्दल केलंय.
‘फडणवीस अजित पवारांना देताहेत बळ’
अलिकडेच एकनाथ शिंदे यांनी मला चेकमेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राऊतांकडून नवा स्फोटक विधान केलं गेलं आहे. “एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला अजित पवार हा सुतार पक्षी भोके पाडेल व या सुतार पक्ष्याला बळ द्यायचे काम देवेंद्र फडणवीस करतील हे आता नक्की झाले. शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनास अजित पवार उपस्थित राहिले नाहीत”, असं राऊतांनी या लेखात म्हटले आहे.
वाचा >> ‘बायको आत्महत्या करेल सांगून शिंदेंकडून घेतलं मंत्रिपद’, भरत गोगावलेंनी टाकला बॉम्ब
“अजित पवार यांना मुख्यमंत्री व्हायचेच आहे व फडणवीस यांना मानणाऱ्या भाजप आमदारांना शिंदे यांचे ओझे झाले आहे. शिंदे यांच्यामुळे महाराष्ट्रात भाजपचे अतोनात नुकसान सुरू आहे, असे सांगणारी शिष्टमंडळे दिल्लीत अमित शहांना भेटतात व महाराष्ट्रात बदल होतील, असे त्या शिष्टमंडळांना सांगण्यात येते. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी 2024 नंतरही आपणच असणार असे श्री. अमित शहांचे वचन असल्याचे शिंदे सांगतात. ते आता खरे नाही. वचन पाळायचे होते तर अजित पवारांचा घोडा रिंगणात आलाच नसता. महाराष्ट्रातले राजकारण हेलकावे खात आहे व त्या अस्थिरतेचा फायदा दिल्लीला घ्यायचा आहे”, असा दावा राऊतांनी केला आहे.
ADVERTISEMENT