Narayan Rane vs Aaditya Thackeray: सिंधुदुर्ग: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर जो शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता तो पुतळा दोन दिवसांपूर्वी अचानक कोसळला. ज्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. याच प्रकरणी शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते हे आज (28 ऑगस्ट) राजकोट किल्ल्यावर जाऊन घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी गेलेले असताना गडावर मात्र ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये तुफान राडा झाला. याच राड्यादरम्यान भाजप आमदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांसमोरच एक खळबळजनक विधान केलं आहे. (sindhudurga i will crush and kill one by one all narayan rane direct threatening language in front of the police when aditya thackeray reached in rajkot fort)
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेते हे जेव्हा राजकोट किल्ल्यावर पोहचले त्याच्या काही मिनिटं आधीच नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे हे किल्ल्यावर आपल्या समर्थकांसह पोहचले होते.
हे ही वाचा>> Rane vs Thackeray : राणे-ठाकरे गटात कशामुळे झाला राडा? राजकोट किल्ल्यावरील INSIDE स्टोरी, पाहा VIDEO
ज्यावेळी आदित्य ठाकरेंनी किल्ल्यात प्रवेश केला तेव्हा ठाकरे आणि राणे यांचे समर्थक हे आमनेसामने आणि अचानक त्यांच्यात धक्काबुक्की सुरू झाली. यामुळे येथे तणावाचं वातावरण निर्माण झालं.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी बराच वेळ किल्ल्यातच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे नारायण राणे आणि निलेश राणे हे प्रचंड संतापलेले दिसून आले. काहीही झालं तरी आपण मुख्य प्रवेश द्वारातूनच बाहेर पडणार असा निर्णय आदित्य ठाकरेंनी घेतला. तर आपण मुख्य द्वारातून हटणार नाही अशी भूमिका राणे पिता-पुत्राने घेतल्याने राजकोट किल्ल्यावर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता.
भाजप खासदार नारायण राणेंची थेट धमकी...
दरम्यान, हा सगळा राडा सुरू असतानाच नारायण राणे हे स्वत: किल्ल्यातच थांबून होते. त्यावेळी पोलिसांसमोरच त्यांनी ठाकरे समर्थकांना धमकी देणारं विधान केलं.
'साहेब, यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांवरुद्ध असहकार्य असेल. आणि त्यांना येऊ दे.. तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या. मी बघतो.. अरे ठेचून एक-एकाला रात्रभर मारुन टाकेन... सोडणार नाही..' असं खळबळजनक विधान नारायण राणेंनी यावेळी केलं.
हे ही वाचा>> Sanjay Raut: '...तर राणे आणि त्यांची मुलं रस्त्यावर ना&% नाचले असते', राऊतांची राणेंवर बोचरी टीका
थेट पोलिसांसमोर अशा प्रकारचं विधान केल्याने आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाणार असा सवाल विचारला जात. मात्र, जो भाजप पक्ष हा शिस्त आणि संयम यासाठी ओळखला जातो त्याच पक्षाच्या खासदाराने अशा प्रकारचं विधान केल्यानंतर आता पक्षाच्या पातळीवर राणेंवर कोणती कारवाई केली जाते का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
'10 मिनिटात पोलीस नाही आले तर..', आदित्य ठाकरेंचाही राणेंना इशारा
दरम्यान, किल्ल्याचा आत असलेल्या आदित्य ठाकरे यांनीही थेट राणेंना इशारा दिला. आदित्य ठाकरे म्हणाले की, 'हा महाराजांचा किल्ला आहे. इथे अशा घटना घडल्या नाही पाहिजेत. यायचं अंगावर निश्चितपणे या.. आम्ही बघून घेऊ. मग शिवसैनिक काय आहे हे आम्ही पण दाखवून देऊ. मी सगळ्यांना एवढ्यासाठीच रोखलं आहे कारण हा महाराजांचा किल्ला आहे.'
'पण 10 मिनिटात पोलीस नाही आले आणि महाराष्ट्रात काही ना काही घडलं तर देवेंद्र फडणवीस साहेब हे जबाबदार राहतील. ते बालिश बुद्धी आहेत. मला वाटतं उंची आणि बुद्धी तेवढीच राहिली आहे.' असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राणेंना राजकोट येथे प्रतिआव्हान दिलं होतं.
आदित्य ठाकरे किल्ल्यातून पडले बाहेर
दरम्यान, सिंधुदुर्ग पोलिसांनी मध्यस्थीनंतर केल्यानंतर आदित्य ठाकरे हे राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले. पण त्यावेळी देखील नारायण राणे आणि निलेश राणे हे बाजूला आपल्या समर्थकांसह उभे होते. त्यावेळी इथे मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही झाली.
ADVERTISEMENT