Eknath Shinde vs Uddhav Thackeray : समान नागरी कायाद्यावरून शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंना घेरण्यास सुरुवात केली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याचे सुतोवाच केले आणि बाळासाहेब ठाकरे यांचे आणखी एक स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल उचलले आहे. मात्र बाळासाहेबांशी रक्ताचे नाते सांगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी या कायद्याला विरोध करण्यास सुरुवात केला आहे. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा राज्यातील जनतेसमोर येत आहे. खरे पाहत उद्धव ठाकरेंनी शिवसेनाप्रमुखांच्या भुमिकेला साजेशी भूमिका घेऊन त्यांच्या विचारांचे समर्थन करण्याची गरज होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी कटीबध्द आहे”, असं सांगत खासदार राहुल शेवाळे यांनी ठाकरेंवर पहिला हल्ला आज चढावला.
ADVERTISEMENT
शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांनी मु्ख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आज एक वर्ष झाले. त्यानिमित्ताने पत्रकार परिषद घेतली.
शेवाळे म्हणाले, “आजचा हा दिवस बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा दिवस साजरा करत आहोत. निष्ठावान शिवसैनिक राज्याचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा भाजपच्या सहकार्याने पूर्ण झाली आहे.”
हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?
“राम मंदिर निर्माण, कलम 370 रद्द करणे व समान नागरी कायदा बनवणे ही बाळासाहेबांची 3 स्वप्ने होती. त्यापैकी दोन स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केली आहेत. समान नागरी कायदा लवकरच येईल”, असे शेवाळे यांनी सांगितलं.
“शिवसेनेचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळासाहेबांच्या एक राष्ट्र, एक कायदा या संकल्पनेशी आम्ही कटिबद्ध आहोत”, असे त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरेंची कोंडी
“शिवसेनाप्रमुखांशी रक्ताचे नाते सांगणारेच या कायद्याला विरोध करत आहेत. या कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. त्यांचा खरा चेहरा समोर येत आहे. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे शिष्टमंडळ नुकतेच उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी सेना भवनमध्ये गेले होते. उद्धव ठाकरे मुस्लिमांना पाठिंबा देतील असा विश्वास मुस्लिमांना आहे. या कायद्यामुळे हिंदूना त्रास सहन करावा लागेल असे ते म्हणत आहेत, मात्र प्रत्यक्षात हा कायदा हिंदूंना प्रभावित करणार नाही तर फक्त गांधी कुटुंबाला प्रभावित करेल, त्यामुळे उध्दव ठाकरे या कायद्याला विरोध करत आहेत”, असं म्हणत शेवाळे यांनी ठाकरेंना घेरलं.
हेही वाचा >> शरद पवारांच्या ‘त्या’ गुगलीवर गेली अजित पवारांची विकेट? फडणवीस ‘सेफ’?
“या कायद्याच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे व बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण होईल”, असेही ते म्हणाले.
व्हीप काढणार
ठाकरेंच्या खासदारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून करण्यास सुरूवात झाली आहे. तसं विधान शेवाळेंनी केलंय. “हा कायदा कोणत्याही समाजाच्या विरोधात नसून प्रत्येकाला त्यांची ओळख विचारात न घेता समान वागणूक देईल. हा कायदा मंजूर होण्यासाठी आम्ही व्हीप जारी करू”, असे ते म्हणाले.
“खरे पाहता मुस्लिम महिलांसाठी हा कायदा अत्यंत लाभदायक ठरेल. या विधेयकामुळे महिलांचे रक्षण होईल व त्यांच्यासाठी हा कायदा वरदान ठरेल”, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा >> BRS : तेलंगणात एकहाती सत्ता, आता महाराष्ट्रावर नजर; कोण आहेत केसीआर?
“मुस्लिम महिलांना सुरक्षित करणारा हा कायदा ठरेल. देशाचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम यांनी देखील समान नागरी कायद्याचे समर्थन केले होते. केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये याबाबतचा प्रस्ताव मांडावा व विधेयक मंजूर करावे अशी विनंती पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना करणार आहे”, अशी माहिती त्यांनी दिली.
“सर्व पक्षांनी या कायद्याला पाठिंबा द्यावा, धार्मिक रंग देऊ नये, गैरसमज पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले. त्याचवेळी उद्धव ठाकरेंनी देखील बाळासाहेबांच्या भूमिकेला समर्थन देणे गरजेचे आहे. समाजात दुही निर्माण करणे, हिंदुंमध्ये गैरसमज पसरवणे असे प्रकार उद्धव ठाकरे यांनी करु नयेत”, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT