मुंबई: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतचा दावा सोडला असला तरी महाराष्ट्रातील नव्या मुख्यमंत्र्याबाबत सस्पेन्स कायम आहे. सरकार स्थापनेनंतर कोणताही असंतोष निर्माण होऊ नये, यासाठी महायुती प्रथम मंत्रिमंडळ विभाजनाच्या सूत्रावर लक्ष केंद्रित करत आहे. या ऐतिहासिक विजयाने महायुतीचे नेते उत्साहात असून, त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा जाहीर करण्याची घाई नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
नव्याने स्थापन झालेल्या सरकारमध्ये मंत्रिमंडळ आणि खात्यांच्या वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यावर युतीचे लक्ष आहे. म्हणजेच आधी मंत्रिमंडळातील जागा सर्वसहमतीने ठरवल्या जातील, त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल. यावेळी भाजपचा मुख्यमंत्री असेल यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
हे ही वाचा>> Maharashtra New CM: शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, पण मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?
आघाडीचे सर्वोच्च नेतृत्व सध्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ रचनेबाबत चर्चा करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर विधीमंडळ पक्षाची बैठक होऊन नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.
आधी सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाईल
शिवसेना सूत्रांचे म्हणणे आहे की, भाजप हायकमांड मुख्यमंत्री पद आणि मंत्रिपदाच्या विभागणीवरून वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. भाजपने अद्याप केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे विधीमंडळ पक्षाच्या बैठकीची तारीख आणि वेळ ठरलेली नाही. महायुतीत आधी सत्तावाटपाचा फॉर्म्युला ठरवला जाणार असल्याचे अंतर्गत सूत्रांचे म्हणणे आहे. त्यानंतर मंत्रिपदांचे वितरण होईल. शेवटी मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाईल.
कोणता फॉर्म्युला निश्चित केला जाणार?
महाराष्ट्र विधानसभेत एकूण २८८ जागा आहेत. मुख्यमंत्र्यांसह 43 मंत्र्यांचा सरकारमध्ये समावेश होऊ शकतो. भाजपला गृहखाते आणि किमान 20 मंत्रालये मंत्रिमंडळात स्वत:कडे ठेवायची आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर शिवसेनेला 11-12 मंत्रिपदांसह सरकारमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहायचे आहे. तसेच राष्ट्रवादीला 10 खाती देण्याची चर्चा आहे. यासोबतच अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्रालय कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नसल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा>> Chandrashekhar Bawankule: " महाराष्ट्रासाठी शिंदेंनी घेतलेली भूमिका ...",चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
तत्पूर्वी मंगळवारी एकनाथ शिंदे यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपालांनी त्यांना काळजीवाहू मुख्यमंत्री बनवले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, मुख्यमंत्रिपद आता भाजपकडे राहणार यावर जवळजवळ सर्वांचं एकमत झालेलं आहे.
भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीने निवडणुकीत एकूण 288 जागांपैकी 230 जागा जिंकल्या आहेत. भाजपने 132, शिवसेनेला 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नव्या मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची मागणी शिवसेना नेत्यांनी लावून धरली होती. मात्र, आज त्यांनी आपला दावा मागे घेतला आहे. तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही फडणवीस यांच्या नावाला सहमती दर्शवली आहे.
ADVERTISEMENT