राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या तिढ्यावरुन दिल्लीत महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून आता सहा दिवस उलटलेत, मात्र अजूनही सत्तास्थापनेचा तिढा सुटू शकलेला नाही. महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी मुख्यमंत्री कोण होणार हे अजून ठरू शकलेलं नाही.गेल्या काही दिवसांपासून यावरुन वेगवेगळ्या घडामोडी मुंबईत सुरू असताच आता दिल्लीतही घडामोडींना वेग आल्याचं पाहायला मिळतं आहे. सुरूवातीला एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं. मात्र एकनाथ शिंदे यांनी स्वत: आपली भूमिका स्पष्ट करत, मुख्यमंत्री जाहीर करताना आपला कुठलीही अडचण होईल असं अजिबात मानू नका,असं म्हणत शर्यतीतून माघार घेतल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे आता दिल्लीतील भाजप हायकमांडकडून कोणता निर्णय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>Eknath Shinde यांना का घ्यावी लागली माघार? 'हे' फॅक्टरही ठरले फेल!
एकनाथ शिंदे यांनी माघार घेतल्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाल्याची एक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र असं असतानाच तिकडे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे विनोद तावडे यांच्यात खलबतं सुरू असल्याचं कळतंय. काल रात्री विनोद तावडे आणि अमित शाह यांच्यात दिल्लीत जवळपास पाऊन तास बैठक झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून समोर आली आहे.
हे ही वाचा >> Maharashtra New CM: महाराष्ट्रातील सत्तेचा नवा फॉर्म्युला आला समोर, पण मुख्यमंत्री...
राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत आहे. अशा काळात मुख्यमंत्री मराठा न झाल्यास मराठा समाजात रोष निर्माण होऊन, मराठा मतं दुरावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाल्यास मराठा मतं कशी टिकवायची यावर ही चर्चा झाल्याची शक्यता आहे.
दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय नेतृत्वाचं लक्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदावर आहे. यासाठीचं एक महत्वाचं कारण म्हणजे, राज्यात विधानसभा निवडणुकीत जरी भाजप आणि महायुतीला यश मिळालं असलं, तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता तोंडावर आहेत. त्यामुळे या निवडणुकांमध्ये सर्व मुद्द्यांवर आधारित विचार करुनच नेतृत्व निवड केली जाईल अशी शक्यता आहे. तसंच विनोद तावडे यांच्या मागच्या काही दिवसांपासूनचा महाराष्ट्राच्या राजकारणातील वाढलेला सहभाग पाहता, त्यांना मुख्यमंंत्रिपद देऊन पुन्हा एक धक्का भाजप नेतृत्व देऊ शकतं अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. मात्र, ज्यावेळी मुख्यमंत्री जाहीर होईल, तेव्हाच चर्चांना ब्रेक लागणार आहे.
ADVERTISEMENT