Eknath Shinde: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं. त्यामुळे महाराष्ट्रात आता भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा अशी मागणी जोरकसपणे लावून धरण्यात आली होती. पण हा विजय एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मिळाला आहे त्यामुळे त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी त्यांच्या पक्षाकडून सुरू होती. त्यामुळेच मागील तीन दिवसांपासून मुख्यमंत्री पदाबाबत खल सुरू होता. अखेर आज (27 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला आहे. मात्र, असं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा अंतिम निर्णय हा मोदी-शाह हेच घेणार आहेत. (maharashtra new cm eknath shinde has given up his claim to the post of chief minister but will modi shah use shock tactics again)
ADVERTISEMENT
मोदी-शाह पुन्हा वापरणार धक्कातंत्र?
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदेंनी एक नवा अध्याय रचला होता. ज्यानंतर त्यांना मुख्यमंत्री पद देऊन भाजपने नवी खेळी केली होती. मात्र, आता निकालानंतर सगळी समीकरणं बदलून गेली आहेत. अशावेळी एकनाथ शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडून दिला आहे. तसेच मोदी-शाह जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल असंही ते यावेळी म्हणाले.
दरम्यान, अमित शाह हे उद्या महायुतीच्या तीनही नेत्यांसोबत बैठक करणार असून त्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय हा जाहीर केला जाईल.
हे ही वाचा>> Eknath Shinde Press conference : 'मी मोदी-शाहांना फोन केला...',मुख्यमंत्री पदाबाबत शिंदेंकडून प्रचंड मोठा निर्णय
मात्र, असं असलं तरीही मोदी-शाह ही जोडगोळी राजकीय धक्कातंत्र वापरण्यात अत्यंत कुशल आहे. त्यांनी आतापर्यंत अनेकांचे अंदाज चुकवत आपल्या राजकीय खेळी खेळल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील येथे झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं होतं. तेव्हा तेथील प्रस्थापितांना बाजूला सारत मोदी-शाह यांनी नवख्या नेत्यांना थेट मुख्यमंत्री पद देऊ केलं.
कोणताही राजकीय निर्णय घेताना त्याचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात हे पाहूनच मोदी आणि शाह तशी पावलं उचलतात. तूर्तास महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत सगळ्यात आघाडीवर आहेत. एकनाथ शिंदे यांनी आता दावाही सोडला आहे. पण तरीही मुख्यमंत्री कोण होणार यावर मोदी-शाह यांनी शिक्कामोर्तब केलेलं नाही.
हे ही वाचा>> ladki Bahin Yojana: महिलांनो! 'या' महिन्यात मिळणार लाडकी बहीण योजनेच्या 6 व्या हफ्त्याचे 1500?
विधानसभा निवडणुकीत मराठा-ओबीसी हा फॅक्टर देखील महत्त्वाचा ठरला होता. अशावेळी आता भाजप मराठा किंवा ओबीसी मुख्यमंत्री देऊ शकतं अशीही जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे भाजपमधील नेतेही आता देखील ठामपणे हे सांगू शकत नाही की, मुख्यमंत्री पदाची माळ ही देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यातच पडेल.
एकनाथ शिंदेंनी सोडला मुख्यमंत्रिपदावरचा दावा
दरम्यान, ठाण्यात पत्रकार परिषदेत घेत एकनाथ शिंदे यांनी आपला मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला. त्यावेळी ते म्हणाले की, 'मी स्वत: काल पंतप्रधान मोदी यांना फोन केला होता. त्यांना फोन करून सांगितलं की, सरकार बनवताना निर्णय घेताना... कुठलं काही असं अडचणीचं आहे किंवा अडचण आहे माझ्यामुळे किंवा इतर कुणामुळे हे अजिबात मनात आणू नका.'
'तुम्ही आम्हाला मदत केलेली, तुम्ही आम्हाला अडीच वर्ष संधी दिली. जनतेचा विकास करण्यासाठी संधी दिली. त्यामुळे तुम्ही निर्णय घ्या.. तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भाजपसाठी अंतिम असतो तसाच आम्हालाही अंतिम आहे. त्यामुळे निर्णय घेताना तुम्ही असं वाटून नका घेऊ की, माझी अडचण आहे का. तर बिलकुल नाही.. त्यामुळे मी काल मोदी साहेबांना, अमित शाह साहेबांना फोन केला.. माझ्या भावना त्यांना मी सांगितल्या. तुम्ही सरकार बनवताना मनात काही ठेवू नका.. तुम्ही सरकार बनवताना जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही निर्णय घ्या. तो मला मान्य असेल.'
'कुठलीही कोंडी राहू नये यासाठी मी तुम्हाला बोलावलं आहे. भाजपचं वरिष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल मुख्यमंत्री बनविण्यासाठी.. त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे, पाठिंबा आहे. मी कालच त्यांना सांगितलं आहे की, जो निर्णय तुम्ही घ्याल तो एकनाथ शिंदेला मान्य आहे, शिवसेनेला मान्य आहे. त्यामुळे कुठलीही कोंडी, अडसर नाराजी असं काही नाही. म्हणून जो निर्णय मोदी-शाह साहेब घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल.' असंही शिंदे म्हणाले.
ADVERTISEMENT