MLA Disqualification : उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केले, आणि सीएम पदावरून उद्धव ठाकरेंना (Former CM Uddhav Thackeray) पायउतार व्हावे लागले. या घटनेनंतर राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघाले. काही दिवसांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर अपात्र आमदारांच्या विषयाने जोर धरला आणि त्यावर निर्णय घेण्यासाठी तारीख पे तारीख सुरु झाली. मात्र आता परिस्थिती बदली असून शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणाचा निकाल आता कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
आम्हाला न्याय मिळणार
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, आमदार अपात्रता प्रकरणी उद्या निकाल येणार असून उद्या दुपार पर्यंत हा निकाल येण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, अध्यक्ष निकालामधून आम्हाला न्याय मिळणार असून सरकार कालही स्थिर होते आणि उद्याही स्थिरच राहणार असल्याचे विश्वासाने सांगितले.
हे ही वाचा >> 4 वर्षाच्या मुलाचा आईनेच चिरला गळा, CEO सूचना सेठने केलेल्या हत्येची Inside Story
निर्णयाकडे डोळे
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अपात्रता प्रश्नावर बोलताना सांगितले की, आम्ही राज्यात कायदेशीर सरकार तयार केले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष उद्या निकाल देतील त्या निकालातून आम्हाला न्याय मिळणार आहे. त्यामुळे आता राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय देतील याकडे साऱ्या राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन्ही गटाच्या याचिका
शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती, मात्र ही सुनावणी 20 डिसेंबर रोजी संपली. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार अध्यक्षांना या प्रकरणाचा निर्णय 10 जानेवारीपर्यंत घ्यायचा आहे. त्यामुळे उद्या राहुल नार्वेकर न्यायाच्या बाजूने निकाल देतील असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे.
कायदेशीर पद्धतीचे सरकार
यावेळी त्यांनी सांगितले की, मला एवढीच अपेक्षा आहे की योग्य कायदेशीर अशा प्रकारचा निर्णय अध्यक्ष घेतील. तसेच शिवसेनेची कायदेशीर बाजू अतिशय भक्कम आहे. त्याचबरोबर अतिशय कायदेशीर पद्धतीचे सरकार आम्ही तयार केले असल्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षांच्या निकालानंतर आम्हाला न्याय मिळणार आहे. तसेच हे सरकार कालही स्थिर होतं उद्याही स्थिरच राहील असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ADVERTISEMENT