New Zealand vs Afghanistan T20 World Cup 2024: T20 विश्वचषक 2024 मध्ये अफगाणिस्तानने मोठा उलटफेर करत न्यूझीलंडला पराभूत केलं. अफगाणिस्तानने 8 जून रोजी गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शानदार आणि नेत्रदीपक विजयाची नोंद केली. या सामन्यात अफगाणिस्तानने 84 धावांनी दणदणीत विजय मिळवला. हा या विश्वचषकातील दुसरा मोठा उलटफेर आहे. याआधी साखळी सामन्यात अमेरिकेच्या संघाने पाकिस्तानवर थरारक विजय मिळवला होता. (afg vs nz t20 world cup highlights afghanistan beat new zealand badly in t20 world cup 2024 created this history)
ADVERTISEMENT
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानने पहिल्यांदाच न्यूझीलंडवर विजय मिळवला. अफगाणिस्तानने 5 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रथमच न्यूझीलंडचा पराभव केला आहे. दुसरीकडे, टी-20 विश्वचषक सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत न्यूझीलंडचा हा सर्वात मोठा पराभव आहे.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानने प्रथम खेळताना 20 षटकांत 6 बाद 159 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ अवघ्या 75 धावांत गारद झाला.
या सामन्यात अफगाणिस्तानच्या विजयाचा नायक रहमानउल्ला गुरबाज होता, त्याने 56 चेंडूत 80 धावांची खेळी केली. त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताब देण्यात आला. तर इब्राहिम झादरान यानेही 44 धावा केल्या.
अफगाणिस्तान संघाने गोलंदाजी केली तेव्हा फजलहक फारुकी आणि कर्णधार राशिद खान यांनी अक्षरश: कहर केला. दोघांनी 4-4 विकेट घेतल्या. सलग T20 कप सामन्यांमध्ये चारहून अधिक विकेट घेणारा फझलहक फारुकी हा अफगाणिस्तानचा पहिला गोलंदाज आहे.
अफगाणिस्तानच्या डावातील हायलाइट्स
या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज (80 धावा, 56 चेंडू, 5 चौकार आणि 5 षटकार) आणि इब्राहिम झादरान (44 धावा, 41 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार) यांनी अफगाणिस्तानसाठी पहिल्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. झादरन बाद झाल्यानंतर अजमतुल्ला उमरझाई आला, त्याने 13 चेंडूत 22 धावा केल्या. मात्र त्यानंतर अफगाणिस्तान संघाच्या विकेट्स सातत्याने पडत राहिल्या. त्यामुळे 20 षटकात 159/6 धावाच करता आल्या. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्ट आणि मॅट हेन्री यांनी 2-2 विकेट घेतल्या. तर लॉकी फर्ग्युसनला 1 विकेट मिळाली.
न्यूझीलंडच्या डावातील हायलाइट्स
160 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंडचा संघ सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकताना दिसला. न्यूझीलंडच्या डावातील पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर फिन ऍलन हा फारुकीच्या एका शानदार इनस्विंग चेंडूवर क्लीन बोल्ड झाला.
त्यामुळे न्यूझीलंडच्या सुरुवात अत्यंत वाईट आणि त्याचा परिणाम संपूर्ण फलंदाजी क्रमावर दिसून आला. यानंतर 'तू चल में आया'च्या धर्तीवर किवी संघाचे फलंदाज सतत बाद होत राहिले. फारुकीने पहिल्या फळीतील फलंदाजांना झटपट माघारी पाठवलं तर, कर्णधार राशिद खान आणि मोहम्मद नबी यांनी मधल्या फळीत फलंदाजांना बाद केलं. न्यूझीलंडचा संघ हा संपूर्ण षटकंही खेळू शकला नाही आणि अवघ्या 15.2 षटकांत 75 धावांत सर्वबाद झाला.
अफगाणिस्तानसाठी फारुकीने 3.2-0-14-4 असा जबरदस्त स्पेल टाकला. त्याचवेळी कर्णधार राशिद खाननेही अप्रतिम गोलंदाजी करत 4 षटकात 17 धावा देत 4 बळी घेतले. अनुभवी मोहम्मद नबीनेही 4 षटकांत केवळ 16 धावा देत 2 बळी घेतले.
ADVERTISEMENT