भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा १५ सदस्यीय संघाचे नेतृत्व करणार आहे. विशेष म्हणजे जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून सावरल्यानंतर संघात परतले आहेत. याशिवाय अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकलाही स्थान मिळाले आहे.
ADVERTISEMENT
भावनिक ट्विट
दिनेश कार्तिक 2007 साली एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला विश्वचषक जिंकणाऱ्या T20 संघाचा भाग होता, 15 वर्षांनंतर आता दिनेश कार्तिक पुन्हा T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात परतला आहे. T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर कार्तिक खूपच भावूक झाला आहे. दिनेश कार्तिकने ट्विटरवर लिहिले की, ‘स्वप्न पूर्ण होतात.’
आशिया कपमध्ये फारशी संधी मिळाली नव्हती
आशिया कप 2022 मध्ये दिनेश कार्तिकला फारशी संधी मिळाली नाही. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी टी-20 मालिकेत त्याला चांगली कामगिरी करून प्लेइंग-11 मध्ये स्थान निश्चित करायचे आहे. T20 विश्वचषकात भारताचा नंबर वन यष्टिरक्षक कोण असावा यावर वाद सुरू आहे आणि ऑस्ट्रेलिया-आफ्रिका मालिकेनंतर चित्र अधिक स्पष्ट होईल असं दिसतंय.
आयपीएलमध्ये केली होती चांगली कामगिरी
आयपीएल 2022 व्यतिरिक्त, कार्तिकने मागच्या काही दिवसात भारतीय संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली आहे. भारतीय संघात परतल्यानंतर दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये पहिले अर्धशतक झळकावले होते. त्याच्या अनुभवाचा भारताला 2022च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत चांगला उपयोग होईल.
T20 विश्वचषक 2022 मध्ये, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत या दोघांना प्लेइंग-11 मध्ये एकत्र स्थान मिळणे कठीण आहे. कारण अशा परिस्थितीत हार्दिक पांड्याला पाचवा गोलंदाज म्हणून खेळावे लागेल. पांड्याने अलीकडच्या काळात चेंडूने चांगला खेळ केला आहे, पण त्याला पाठीच्या दुखापतींशी सामना करावा लागत आहे.
ADVERTISEMENT