डॉ. शर्वरी यांनी या स्पर्धेत ३५० किलो वजन उचलत ही ऐतिहासीक कामगिरी करुन दाखवली. शर्वरी यांची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. याआधी त्यांनी जिल्हा आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. यंदाच्या वर्षात गोव्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवल्यानंतर डॉ. शर्वरी यांनी इस्तांबूलसाठी निवड झाली होती.
ADVERTISEMENT
गेल्या चार वर्षांपासून डॉ. शर्वरी या स्पर्धांसाठी तयारी करत आहेत. इस्तंबूलमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर डॉ. शर्वरी यांनी मुंबई तक शी संवाद साधला. “२०१७ साली केरळमध्ये मी पहिल्यांदा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले. या स्पर्धेत मी सर्वात शेवटच्या स्थानावर होते. परंतू हार मानायची नाही हे मी ठरवलंच होतं आणि यातूनच मी माझा सराव आणि स्पर्धांमध्ये सहभाग सुरु ठेवला. या प्रवासात आपल्या परिवारासह पतीनेही माझी साथ दिली.”
इस्तंबूलमध्ये जाण्याची शर्वरी यांची पहिलीच वेळ होती. स्पर्धेच्या ठिकाणी पोहचल्यावर शर्वरी यांच्या अंगावर शहारा आला होता. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधीत्व करण्याची शर्वरीची ही पहिलीच वेळ होती. परंतू आपला परिवार आणि पती टिव्हीवर बघताना त्यांना कसं वाटेल हा विचार करुन शर्वरी यांनी मैदानात उतरायचं ठरवलं. यातूनच त्यांना जोश आला आणि त्यांनी इस्तंबूलमध्ये इतिहास घडवला. शर्वरी यांनी स्पर्धेदरम्यान बेंच प्रेसमध्ये ७० किलो, डेडलिफ्टमध्ये १५० किलो तर स्क्वाट प्रकारात १३० किलोचं वजन उचलून विक्रम आपल्या नावे केला.
याआघीही डॉ. शर्वरी यांचा साडी नेसून वेटलिफ्टींग करण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यापुढे शर्वरी यांना एशिया पॅसिफीक चॅम्पिअनशीप आणि वर्ल्ड चँपिअनशीप मध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. यासाठी त्या पुण्यात सराव करणार आहेत. डॉ. शर्वरी यांना दोन मुलं असून त्यांचे पती डॉ. वैभव इनामदार हे देखील पुण्यात प्रॅक्टीस करतात.
ADVERTISEMENT