अहमदाबाद: धडाकेबाज कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स (GT) आपल्या पदार्पणातच आयपीएल 2022 चे विजेतेपद पटकावलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा (RR) 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. राजस्थानने गुजरातसमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं, जे गुजरातने 18.1 षटकात फक्त 3 गडी गमावून साध्य केलं. आयपीएलमधील GT चा हा पहिलाच सीझन होता.
ADVERTISEMENT
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने नऊ गड्यांच्या मोबदल्यात 130 धावा केल्या. राजस्थानकडून जोस बटलरने सर्वाधिक 39 आणि यशस्वी जैस्वालने 22 धावा केल्या. इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गुजरात टायटन्सकडून हार्दिक पांड्याने 17 धावांत तीन बळी घेतले.
नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या राजस्थान संघाने संथ सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली. चौथ्या षटकात यशस्वी बाद झाल्यानंतर ही भागीदारी तुटली. त्याला यश दयालने झेलबाद केले. यशस्वीने 16 चेंडूत 1 चौकार आणि 2 षटकारांसह 22 धावा केल्या. यानंतर बटलर आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 29 धावांची भागीदारी केली. पण कर्णधार सॅमसनला मोठी खेळी खेळता आली नाही आणि तो नवव्या षटकात हार्दिक पांड्याचा बळी ठरला. सॅमसनने 11 चेंडूत 14 धावा केल्या.
देवदत्त पडिकल (10 चेंडूत 2 धावा) मोठी खेळी करेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्याला त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. राजस्थानचा संपूर्ण संघ हा बटलर बाद होताच बॅकफूटवर गेला. बटलर 35 चेंडूत 39 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार मारले. पण 13व्या षटकात हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर बटलर झेलबाद झाला. यानंतर शिमरॉन हेटमायर (12 चेंडूत 11), रविचंद्रन अश्विन (9 चेंडूत 6), ट्रेंट बोल्ट (7 चेंडूत 11), ओबेद मॅककॉय (5 चेंडूत 8) आणि रिया पराग (15 चेंडूत 15) धावा केल्या. यावेळी गुजरातकडून हार्दिकने तीन, किशोरने दोन तर मोहम्मद शमी, दयाल आणि रशीदने प्रत्येकी एक विकेट घेतली.
खूपच रोमांटिक आहे संजू सॅमसनची लव्ह-स्टोरी
गुजरातने पदार्पणातच रचला इतिहास
गुजरातचा नवा आयपीएल संघ त्याच्या पहिल्या सत्रातच आश्चर्यकारक कामगिरी करण्यात यशस्वी ठरला. लीग टप्प्यातील दमदार कामगिरीनंतर गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. त्याने 14 पैकी 10 सामने जिंकले आणि गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. यानंतर हार्दिक ब्रिगेडने क्वालिफायर-1 मध्ये राजस्थानचा 7 गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती.
यापूर्वी, गुजरातने साखळी फेरीत राजस्थानचा 37 धावांनी पराभव केला होता. आपलची हीच कामगिरी कायम ठेवत अंतिम सामन्यात गुजरातने राजस्थानला हरवून एक नवा इतिहास रचला आहे.
राजस्थानने दुसऱ्यांदा गाठली अंतिम फेरी
राजस्थानचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. राजस्थानने लीग टप्प्यातील 14 पैकी 9 सामने जिंकलेले आणि 18 गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. यानंतर पहिल्या क्वालिफायरमध्ये ते पराभूत झाले होते पण राजस्थानने क्वालिफायर-2 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) 7 गडी राखून पराभव करून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला होता.
राजस्थानने पंधरा वर्षांपूर्वी पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाऊल ठेवले होते, ही लक्षात घेण्यासारखी बाब आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली 2008 च्या पहिल्या सत्रात राजस्थानने ट्रॉफीवर कब्जा केला होता. त्यानंतर एकदाही राजस्थान रॉयल्सला अंतिम फेरीत जाता आलं नव्हतं.
ADVERTISEMENT