भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या खूप वाईट टप्प्यातून जात आहे. अडीच वर्षे झाले कोहलीच्या बॅटमधून एकही शतक निघालेले नाहीये. तसेच गेले पाच महिने झाले त्याला अर्धशतकही करता आलेले नाही. नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कोहलीने 6 आंतरराष्ट्रीय डावात केवळ 76 धावा केल्या.
ADVERTISEMENT
या खराब कामगिरीमुळे कोहली टीकेचा धनी होत आहे. मात्र यादरम्यान कोहलीने चाहत्यांना एक मेसेज दिला आहे. ते त्याच्या टीकाकारांना उत्तरही मानता येईल. या मेसेजमध्ये कोहलीने आपले पुढील ध्येय सांगितले आहे तसेच त्यासाठी तो काहीही करायला तयार असल्याचे तो म्हणाला.
विराट कोहली काय म्हणाला?
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना विराट कोहली म्हणाला, ‘टीम इंडियाला आशिया कप आणि विश्वचषक जिंकूण देण्यास मदत करणे हे माझे ध्येय आहे. यासाठी जे काही करावे लागेल, त्यासाठी मी तयार आहे. आशिया कप सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत आयोजित केला जाणार होता, परंतु आता तो यूएईमध्ये आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषकही होणार आहे. या दोन्ही मोठ्या स्पर्धा टी-20 फॉरमॅटमध्ये असणार आहेत.
कोहली महिनाभराच्या रजेवर
सध्या विराट कोहली एका महिन्याच्या ब्रेकवर आहे. पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकासोबत तो फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. अलीकडेच इंग्लंडविरुद्ध कसोटी, टी-20 आणि त्यानंतर वनडे मालिका खेळून कोहली सुट्टीवर गेला आहे. आता त्याला पुढील एक महिना कोणतीही मालिका खेळायची नाही.
ऑगस्टमध्ये टीम इंडियाला झिम्बाब्वे दौऱ्यावर जायचे आहे. तसेच आशिया कप खेळायचा आहे. दोन्ही स्पर्धांचे शेड्यूल अद्याप जाहीर झालेले नाही. अशा स्थितीत कोहलीने महिनाभराच्या विश्रांतीचा विचार केला आहे.
कोहलीने वेस्ट इंडिज दौऱ्यातून घेतली विश्रांती
इंग्लंडनंतर टीम इंडिया आता वेस्ट इंडिज दौऱ्यावर गेली आहे. येथे भारतीय संघ विंडीजविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. शिखर धवन संघाचे नेतृत्व करत आहे. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा यापूर्वीच करण्यात आली आहे. या दोन्ही मालिकांसाठी विराट कोहलीची निवड करण्यात आलेली नाही.
ADVERTISEMENT