भारतीय संघाने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ची विजयासह शानदार सुरुवात केली. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने सरस कामगिरी करत कांगारूंचा धुव्वा उडवला. (the Indian team defeated Australia by 6 wickets)
ADVERTISEMENT
पहिल्याच सामन्यात रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव या स्टार फिरकीपटूंनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाला 199 धावांत गुंडाळले. जडेजाने 3 तर कुलदीपने 2 बळी घेतले. यानंतर भारतीय संघाला 200 धावांचे सोपे लक्ष्य मिळाले, पण सुरुवातील तेही अशक्य वाटत होते.
टॉप-3 फलंदाजांना उघडता आले नाही खाते
भारतीय संघाने पहिल्या 2 षटकात 2 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या. कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांना खातेही उघडता आले नाही. तिन्ही स्टार खेळाडू शून्यावर बाद झाले. यानंतर विराट कोहली आणि केएल राहुल यांनी सामन्याची सूत्रं हाती घेतली आणि कांगारूंचा मारा निष्प्रभ ठरवत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला.
कोहली-राहुलने केली 165 धावांची भागीदारी
पहिल्या तीन विकेट केवळ 2 धावांवर पडल्यानंतर भारतीय संघाला हा सामना जिंकणे सोपे जाणार नाही, असेच भारतीयांना वाटत होते. ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शक्यता बऱ्यापैकी वाढली होती. अशा वेळी विराट कोहलीने 116 चेंडूत 85 धावांची, तर केएल राहुलने 115 चेंडूत 97 धावांची नाबाद खेळी खेळत कांगारू संघाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने 41.2 षटकांत 4 गडी गमावून 201 धावा करत सामना जिंकला.
या सामन्यात कोहली आणि राहुल यांनी पाचव्या विकेटसाठी 165 धावांची शानदार भागीदारी केली. या दोघांनीही संपूर्ण डावात सावधपणे फलंदाजी केली. दरम्यान, त्याला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने झटपट धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाकडून वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने 3 आणि मिचेल स्टार्कने 1 बळी घेतला.
ऑस्ट्रेलिया डाव 199 धावांत आटोपला
या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो सुरुवातीला बरोबर वाटत असला तरी भारतीय फिरकीपटूंसमोर तो चुकीचा ठरला. संघाने 27 षटकांत 2 बाद 110 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर सातत्याने विकेट पडत राहिल्याने कांगारूंचा संघ 49.3 षटकांत 199 धावांत गडगडला.
संघाकडून स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 46 धावा केल्या. त्यांच्याशिवाय डेव्हिड वॉर्नरने 41, मिचेल स्टार्कने 28 आणि मार्नस लॅबुशेनने 27 धावा केल्या. त्याच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला 20 चा आकडा गाठता आला नाही. तर भारतीय गोलंदाजीत रवींद्र जडेजाने 28 धावांत 3 बळी घेतले. कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी 2 गड्यांना तंबूत पाठवले.
ADVERTISEMENT