भारताविरुद्ध लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडने सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. कर्णधार जो रुटच्या धडाकेबाज शतकी खेळाच्या जोरावर इंग्लंडने भारताने दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत आपली बाजू भक्कम केली आहे. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे दुसऱ्या कसोटीतही जो रुटची बॅट चांगलीच तळपली. भारतीय बॉलर्सचा नेटाने सामना करत त्याने सामन्यावरची इंग्लंडची पकड ढिली होऊ दिली नाही.
ADVERTISEMENT
लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतकी खेळीच्या माध्यमातून जो रुटने अनेक विक्रमांची नोंद केली. जॉनी बेअरस्टो आणि जो बटलर यांच्यासोबत रुटने इंग्लंडच्या डावाला आकार दिला. जो रुटच्या शतकी खेळीचं वैशिष्ट्य जाणून घेऊयात…
वर्ष २०२१ हे जो रुटसाठी अत्यंत चांगलं गेलं आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत जो रुटने ५ शतक झळकावली आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या संघाना एकत्र येऊन अशी कामगिरी करणं जमलेलं नाहीये. यावरुन जो रुट सध्या किती चांगल्या फॉर्मात आहे हे लक्षात येईल.
या शतकी खेळीदरम्यान जो रुटने कसोटी क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
जॉनी बेअरस्टो आणि जो रुट यांनी तिसऱ्या दिवशी पहिलं सत्र खेळून काढलं. भारताच्या बॉलर्सची ही जोडी फोडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतू त्यांना अपयश आलं. लंचब्रेकनंतर मोहम्मद सिराजने बेअरस्टोला आऊट करुन इंग्लंडची जोडी फोडली. यानंतर रुटने बटलरच्या साथीने संघाचा डाव सावरला. त्यामुळे यजमान इंग्लंड पहिल्या डावात आघाडी मिळवण्यात यशस्वी ठरतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
ADVERTISEMENT