Ind vs NZ : रोहित शर्मा-द्रविड जोडीचा पहिला विजय, भारताची न्यूझीलंडवर ५ विकेटने मात

मुंबई तक

• 05:23 PM • 17 Nov 2021

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ५ विकेट राखून मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने झुंजार अर्धशतक झळकावलं. त्याला कर्णधार रोहित शर्मानेही उत्तम साथ दिली. अखेरच्या ओव्हरमध्ये सामना अटीतटीचा झाला असताना पंतने सामना जिंकवत […]

Mumbaitak
follow google news

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध मालिकेची विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ५ विकेट राखून मात करत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून सूर्यकुमार यादवने झुंजार अर्धशतक झळकावलं. त्याला कर्णधार रोहित शर्मानेही उत्तम साथ दिली. अखेरच्या ओव्हरमध्ये सामना अटीतटीचा झाला असताना पंतने सामना जिंकवत भारताला आघाडी मिळवून दिली आहे. भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडचाही हा पहिलाच विजय ठरला आहे.

हे वाचलं का?

टॉस जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. आयपीएलची स्पर्धा गाजवणाऱ्या व्यंकटेश अय्यरने या सामन्यात भारतासाठी पदार्पण केलं. भुवनेश्वर कुमारने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये टी-२० वर्ल्डकप गाजवणाऱ्या डॅरेल मिचेलचा त्रिफळा उडवला. यानंतर मार्टीन गप्टील आणि मार्क चॅम्पमॅन यांनी महत्वाची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. गप्टील आणि चॅम्पमॅन यांनी जयपूरच्या मैदानाच चौफेर फटकेबाजी करत महत्वाच्या षटकांमध्ये धावा जमवल्या.

दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी १०९ धावांची भागीदारी करत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला. मिचेल आणि चॅम्पमॅन जोडीने आपली अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आश्विनने चॅम्पमॅनला क्लिन बोल्ड केलं. त्याने ५० बॉलमध्ये ६ फोर आणि २ सिक्स लगावत ६३ रन्स केल्या. यापाठोपाठ ग्लेन फिलीप्सही आश्विनच्या जाळ्यात अडकला.

यानंतर मार्टीन गप्टीलने एक बाजू लावून धरत सेफर्टच्या साथीने संघाचा डाव सावरला. ७० धावांवर असताना चहरने मोक्याच्या क्षणी गप्टीलची विकेट घेत न्यूझीलंडला धक्का दिला. पाठोपाठ टीम सेफर्ट, रचिन रविंद्र यांना भारतीय गोलंदाजांनी माघारी धाडलं. त्यामुळे निर्धारीत ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा संघ १६४ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून आश्विन आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी २-२ तर चहर आणि सिराजने १-१ विकेट घेतली.

प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने सावध पण आश्वासक सुरुवात केली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल जोडीने पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. या भागीदारीत रोहित शर्माने आक्रमक पवित्रा घेत काही चांगले फटके खेळले. सँटनरने लोकेश राहुलला आऊट करत भारताची सलामीची जोडी फोडली. राहुल १५ रन्स काढून माघारी परतला. यानंतर रोहित शर्माने आपला मुंबईकर साथीदार सूर्यकुमार यादवच्या सहाय्याने भारताच्या डावाला आकार दिला.

सूर्यकुमार आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी करुन भारताचं आव्हान कायम राखलं. सूर्यकुमार यादवनेही या भागीदारीत काही सुरेख फटके खेळत न्यूझीलंडवर दडपण कायम राखलं. रोहित शर्मा आपलं अर्धशतक पूर्ण करणार असं वाटत असतानाच ट्रेंट बोल्टने त्याचा अडसर दूर केला. रोहित माघारी गेल्यानंतरही सूर्यकुमार यादवने ऋषभ पंतच्या साथीने छोटेखानी भागीदारी करुन आपलं अर्धशतक पूर्ण केलं. परंतू मैदानावर स्थिरावलेला असतानाही थर्ड मॅनच्या दिशेने फटका खेळण्याच्या प्रयत्नात सूर्यकुमार क्लिन बोल्ड झाला. बोल्टने त्याची इनिंग ६२ धावांवर संपवली.

यानंतर मधल्या फळीत श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर यांनी निराशा केल्यामुळे सामना अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगला. परंतू ऋषभ पंतने अखेरच्या क्षणापर्यंत संयम राखत ३ बॉलमध्ये ३ रन्स हव्या असताना विजयी चौकार लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

    follow whatsapp