कानपूर कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेण्यात यशस्वी झालेल्या भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडसमोर लोटांगण घातलं. परंतू मधल्या फळीत श्रेयस अय्यर, वृद्धीमान साहा यांच्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने आपला डाव सावरत न्यूझीलंडला विजयासाठी २८४ धावांचं आव्हान दिलं.
ADVERTISEMENT
पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या श्रेयस अय्यरने दुसऱ्या डावात ६५ तर मानेच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या वृद्धीमान साहानेही नाबाद ६१ धावांची इनिंग खेळली.
तिसऱ्या दिवसाअखेरीस शुबमन गिलची विकेट गमावलेल्या भारताची चौथ्या दिवशीही खराब सुरुवात झाली. मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रविंद्र जाडेजा हे सर्व फलंदाज चौथ्या दिवशी झटपट माघारी परतले. साऊदी आणि जेमिन्सनने टीम इंडियाच्या आघाडीच्या फळीला सुरुंग लावत भारतीय गोटात चिंतेचं वातावरण तयार केलं. ५ बाद ५१ अशी परिस्थिती असताना श्रेयस अय्यरने रविचंद्रन आश्विनच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करत संघाच्या डावाला आकार दिला.
दोघांमध्येही ५२ धावांची भागीदारी झाल्यानंतर जेमिन्सनने आश्विनला माघारी धाडलं. यानंतर मैदानात आलेल्या वृद्धीमान साहाने श्रेयस अय्यरला चांगली साथ दिली. साहाच्या साथीने श्रेयस अय्यरने आपलं अर्धशतक पूर्ण करत भारताची बाजू वरचढ केली. दोघांमध्ये ६४ धावांची भागीदारी झाल्यानंतर श्रेयस अय्यर साऊदीच्या बॉलिंगवर ६५ रन्स करुन माघारी परतला. यानंतर साहाने हार न मानता एक बाजू लावून धरत किल्ला लढवला.
खराब चेंडूवर पुढे येऊन सुरेख फटकेबाजी करत साहाने न्यूझीलंडवर दबाव वाढवला. दुसऱ्या बाजूने अक्षर पटेलनेही त्याला चांगली साथ दिली. दोघांनीही न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या नाकीनऊ आणत भारताला द्विशतकी आघाडी मिळवून दिली. अखेरीस ७ बाद २३४ धावसंख्येवर अजिंक्य रहाणेने भारताचा डाव घोषित केला. न्यूझीलंडकडून साऊदी आणि जेमिन्सनने प्रत्येकी ३-३ तर एजाज पटेलने १ विकेट घेतली.
दरम्यान दुसऱ्या डावातही न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. रविचंद्रन आश्विनच्या बॉलिंगवर विल यंग २ धावा काढून माघारी परतला. भारतीय खेळाडूंनी केलेलं LBW चं अपील पंच विरेंद्र शर्मा यांनी उचलून धरलं. परंतू प्रत्यक्षात विल यंग आऊट नव्हता, परंतू DRS घेण्यात उशीर झाल्यामुळे विल यंगला मैदान सोडावं लागलं. त्यामुळे दुसऱ्या डावात न्यूझीलंडने १ विकेट गमावत ४ धावांपर्यंत माजल मारली. ज्यामुळे अखेरच्या दिवशी या सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांना झुंजावं लागणार आहे.
ADVERTISEMENT