आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज (28 ऑगस्ट) शानदार सामना खेळला जात आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार असून सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. दुबईत होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेणार आहे.
ADVERTISEMENT
दोन मोठ्या संघांमधील हा सामना आहे, त्यामुळे खेळाडूंवर मोठे दडपण असणार आहे. पण तरीही टीम इंडियाचे पारडे जड आहे, कारण संघाकडे मोठ्या खेळाडूंची फौज आहे. त्याचबरोबर अशा मोठ्या उच्च दबावाच्या सामन्यांमध्ये खेळण्याचा अनुभवही भारताकडे आहे.
पाकिस्तानविरुद्ध भारताचं पारडं का जड आहे?
रोहित-राहुलची जोडी करणार कमाल
1) रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर टीम इंडियाने फलंदाजीची पद्धत बदलली आहे. आता पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी दिसून येत आहे. रोहितचा सलामवीर जोडीदार केएल राहुल रोहितसोबत मैदानात उतरणार आहे, त्यामुळे दोघांचीही फलंदाजी पाहायला मजा येणार आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकात दोघेही अपयशी ठरले होते, पण यावेळी त्यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल अशी अपेक्षा आहे.
2) विराट कोहलीचे पुनरागमन पाकसाठी धोकादायक
टीम इंडियाचा किंग विराट कोहली तब्बल दीड महिन्यानंतर मैदानात परतत आहे. त्याच्या आवडता शत्रू पाकिस्तानविरुद्ध हे पुनरागमन होत आहे. कोहलीला मोठ्या मंचावर चांगल्या धावा करण्याची सवय आहे, त्यामुळे चाहत्यांच्या आशा त्याच्यावर टिकून आहेत. विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यातील रेकॉर्ड शानदार आहे. त्याने 7 सामन्यात 78 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत.
3) सूर्यकुमार यादवची फलंदाजी
गेल्या एका वर्षात सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी एक मोठा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. विराट कोहलीनंतर चौथ्या क्रमांकावर आल्यास त्याला सुरुवातीपासूनच आक्रमण करण्याची संधी असणार आहे. पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी अद्याप सूर्यकुमार यादवचा खेळ पाहिला नाही, अशा परिस्थितीत त्याचे अप्रतिम फटके उपयुक्त ठरू शकतात.
4. फिनिशर सामना जिंकवतील…
टीम इंडियाकडे सध्या टी-20 संघात तीन-तीन सर्वोत्तम फिनिशर आहेत. हार्दिक पंड्याने जोरदार पुनरागमन केले आहे, ऋषभ पंतही पाचव्या क्रमांकावर येऊन वेगवान धावा करू शकतो. तसेच, दिनेश कार्तिकला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले तर ते सोन्याहून पिवळं असणार आहे. कारण दिनेश कार्तिक फिनिशर म्हणून दमदार फॉर्ममध्ये धावा करत आहे. त्याचा अनुभव पाकिस्तानविरुद्ध कामी येईल.
5. भारताच्या गोलंदाजीत दम आहे.
भारतीय संघात जसप्रीत बुमराह नसला तरी टीम इंडियाची गोलंदाजी अजूनही मजबूत आहे. भुवनेश्वर कुमारचा अनुभव आणि स्विंग, तसेच अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांचा वेग टीम इंडियासाठी उपयुक्त ठरेल. विशेष म्हणजे या दोघांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली असून ते पाकिस्तानी फलंदाजांसाठी नवीन असतील. यासह युझवेंद्र चहल किंवा रवींद्र जडेजा प्लेइंग-11 मध्ये असतील तर दुबईच्या मैदानात फिरकी गोलंदाज चमत्कार करू शकतात.
ADVERTISEMENT