Ind Vs Pak: T-20 वर्ल्डकपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. या हायहोल्टेज सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार विराट कोहलीने पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी विराट कोहलीने असं म्हटलं की, आम्ही या सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहोत, आम्ही पूर्ण आत्मविश्वासाने सामना खेळण्यासाठी मैदानात उतरु. त्याचवेळी विराट कोहली असंही म्हणाला की, पाकिस्तानचा संघही खूप मजबूत आहे.
ADVERTISEMENT
जेव्हा एका पाकिस्तानी पत्रकाराने पत्रकार परिषदेत सामन्याबद्दल प्रश्न विचारला आणि रेकॉर्डबद्दल काही प्रश्न विचारले तेव्हा विराट कोहली म्हणाला की, ‘आम्ही कधीही रेकॉर्डबद्दल बोलत नाही, यापूर्वी काय घडले त्यावर फार लक्ष देत नाही.’
‘पाकिस्तानचा संघ खूप मजबूत आहे’
विराट कोहली असं म्हणाला की, ‘सामन्याच्या दिवशी तुम्ही कसे खेळता यावर सर्व काही अवलंबून असते. पाकिस्तानचा संघ खूप मजबूत संघ आहे, त्यांच्याविरुद्ध तुम्हाला तुमचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पाकिस्तानकडे असे खेळाडू आहेत जे ऐनवेळी सामना फिरवू शकतात. आम्हाला आमच्या प्लॅनवर लक्ष केंद्रीत करावे लागेल.’
टी -20 विश्वचषकाच्या तयारीबाबत विराट कोहली म्हणाला की, विश्वचषकात तुम्हाला वेगवेगळ्या संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळते, ज्यांच्यासोबत आम्ही आधी खेळलेलो नाही अशा संघाविरुद्ध देखील सामना होतो. बायो-बबलबद्दल खेळाडूंशी बोलणे महत्वाचे आहे, कारण अशा परिस्थितीत सतत क्रिकेट खेळणे कठीण आहे.’
भारत आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी सामना होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी खास आहे. कारण बऱ्याच काळानंतर दोन्ही देशांदरम्यान सामना होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार याकडेच अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
दरम्यान, या सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना या सामन्यासाठी पाकिस्तानने आपल्या 12 खेळाडूंची घोषणा केली आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, शाहीन आफ्रिदी, हसन अली, हरीस रौफ, हैदर अली
T20 WC, Ind Vs Pak: भारताविरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, पाहा कोण-कोण असणार संघात
दुसरीकडे टीम इंडिया आपला संघ उद्या म्हणजे सामन्याच्या वेळेसच जाहीर करणार आहे. त्यामुळे या संघात नेमकं कोणाकोणाला स्थान मिळणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.
ADVERTISEMENT