Ind vs SL 2nd Test: बंगळुरु येथे खेळल्या जात असलेल्या डे-नाईट कसोटी सामन्यावर भारताची पकड मजबूत झाली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने दुसऱ्या डावात एका विकेट गमावून 28 धावा केल्या होत्या. कुसल मेंडिस 16 आणि दिमुथ करुणारत्ने 10 धावांवर खेळत आहेत. श्रीलंकेला अजूनही विजयासाठी 419 धावांची गरज आहे, जी अगदीच अशक्य गोष्ट वाटत आहे. तर भारताला विजयासाठी आणखी 9 विकेट्सची गरज आहे.
ADVERTISEMENT
दुसऱ्या डावात श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. पहिल्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर लाहिरू थिरिमाने क्लीन बोल्ड झाला. त्याला पहिल्या डावात टीम इंडियाचा हिरो जसप्रीत बुमराहने बाद केलं. थिरिमानेला आपलं खातेही उघडता आले नाही.
भारताने 303/9 वर दुसरा डाव केला घोषित
भारतीय संघाने आपला दुसरा डाव नऊ बाद 303 धावांवर घोषित केला. त्यामुळे श्रीलंकेला 447 धावांचं प्रचंड मोठं लक्ष्य मिळालं आहे. भारताकडून दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने 67 आणि ऋषभ पंतने 50 धावांचे योगदान दिले. पंतने अवघ्या 28 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हा कसोटी क्रिकेटमधील भारतीय विक्रम आहे.
याशिवाय कर्णधार रोहित शर्माने 46 आणि मयंक अग्रवाल आणि रवींद्र जडेजाने 22-22 धावांचे योगदान दिले. श्रीलंकेकडून प्रवीण जयविक्रमाने सर्वाधिर चार आणि लसिथ एम्बुल्डेनियाने तीन गडी बाद केले.
श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला
तत्पूर्वी, आज श्रीलंकेने दिवसाची सुरुवात ही 86/6 च्या पुढे केली होती. पण पहिल्या डावात श्रीलंकेचा संघ केवळ 109 धावाच करु शकला. पहिल्या डावात जसप्रीत बुमराहने पाच विकेट घेतल्याने भारताने पाहुण्या संघाला पहिल्या डावात 109 धावांवरच रोखलं. भारताविरुद्धच्या कसोटीत श्रीलंकेची ही दुसरी सर्वात कमी धावसंख्या होती. 1990 मध्ये चंदिगडमध्ये श्रीलंकेने 82 धावा केल्या होत्या. बुमराहशिवाय रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी दोन, तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. पाहुण्या संघाकडून अँजेलो मॅथ्यूज (43) आणि निरोशन डिकवेला (21) यांनी सर्वाधिक धावा केल्या.
मंकडींग ते चेंडूला लाळ लावण्यास बंदी : क्रिकेटच्या नियमांमध्ये महत्वाचे बदल, जाणून घ्या…
भारताच्या पहिल्या डावात 252 धावा
सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा पहिला डाव 252 धावांवर आटोपला होता. यावेळी श्रेयस अय्यरने 92 आणि ऋषभ पंतने 39 धावांचे योगदान दिले होते. श्रीलंकेकडून लसिथ एम्बुल्डेनिया आणि प्रवीण जयविक्रमाने प्रत्येकी तीन बळी घेतले होते. मोहाली कसोटी सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. ताज्या परिस्थिती पाहता या सामन्यात भारताची स्थिती भक्कम दिसत आहे. त्यामुळे हा सामना देखील जिंकून भारत कसोटीत श्रीलंकेला क्लीन स्वीप देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
ADVERTISEMENT