विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अखेरच्या टी-२० मॅचमध्ये इंग्लंडवर ३६ रन्सनी मात करत ५ टी-२० सामन्यांची मालिकात ३-२ च्या फरकाने जिंकली आहे. मालिकेत दोनवेळा पिछाडीवर पडल्यानंतरही विराट कोहलीच्या भारतीय संघाने आश्वासक कामगिरी करत दणक्यात पुनरागमन करुन मालिकेत बाजी मारली आहे. अखेरच्या मॅचसाठी संघात बदल केलेल्या भारतीय संघाने संपूर्ण सामन्यात इंग्लंडवर वर्चस्व गाजवलं.
ADVERTISEMENT
इंग्लंडचा कॅप्टन मॉर्गनने टॉस जिंकत पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या मॅचसाठीही विराट कोहलीने पुन्हा एकदा आपलं धक्कातंत्र आजमावत लोकेश राहुलला विश्रांती देत स्वतः रोहितसोबत ओपनिंगला येणं पसंत केलं. भारतीय संघाची ही चाल इंग्लंडला चांगलीच महागात पडली. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने धडाकेबाज सुरुवात करत इंग्लंडला बॅकफूटवर ढकललं. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ९४ रन्सची पार्टनरशीप केली. ३४ बॉलमध्ये ४ फोर आणि ५ सिक्स लगावत रोहित स्टोक्सच्या बॉलिंगवर आऊट झाला. यानंतर मैदानावर आलेल्या सूर्यकुमार यादवनेही हाच कित्ता पुढे गिरवत इंग्लंडच्या बॉलिंगवर आक्रमण करायला सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने विराट कोहलीही आपल्या फॉर्मात होता. भारतीय बॅट्समनवर अंकुश लावण्यात इंग्लंडचे बॅट्समन पूर्णपणे अपयशी ठरत होते.
१७ बॉलमध्ये ३ फोर आणि २ सिक्स लगावत सूर्यकुमार ३२ रन्स काढून आऊट झाला. आऊट झाल्यानंतर यानंतर हार्दिक पांड्याने विराट कोहलीची उत्तम साथ देत भारताला २०० च्या पुढे पोहचवलं. पहिल्या इनिंग अखेरीस विराट ८० तर हार्दिक पांड्या ३९ रन्सवर नॉटआऊट राहिला. भारताने इंग्लंडला विजयासाठी २२५ रन्सचं आव्हान दिलं.
प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात खराब झाली. भुवनेश्वर कुमारने जेसन रॉयला क्लिन बोल्ड करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. यानंतर जोस बटलर आणि ड्वाइड मलान यांनी चांगली भागीदारी करत भारतीय बॉलर्सना चांगलाच घाम फोडला. दुसऱ्या विकेटसाठी १३० रन्सची पार्टनरशीप झाल्यानंतर सामना भारत गमावणार असं वाटत असताना भुवनेश्वरने जोस बटलरला ५२ रन्सवर आऊट केलं. यानंतर इंग्लंडच्या डावाला गळती लागली. चौथी टी-२० गाजवणाऱ्या शार्दुल ठाकूरने एकाच ओव्हरमध्ये बेअरस्टो आणि मलानची विकेट घेत इंग्लंडला बॅकफूटला ढकललं. यानंतर इंग्लंडचा संघ कमबॅक करुच शकला नाही. अखेरच्या फळीतल्या बॅट्समननी फटकेबाजी करुन सामन्यात रंगत आणण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांचे प्रयत्न अपुरेच पडले. अखेरीस इंग्लंडचा संघ १८८ रन्सपर्यंत मजल मारु शकला. टी-२० सिरीजनंतर भारतीय संघ पुण्यात इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.
ADVERTISEMENT