केप टाऊन कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेला २१२ धावांचं आव्हान दिलं आहे. पहिल्या डावात २२३ धावांपर्यंत मजल मारणाऱ्या भारतीय संघाचा दुसरा डाव १९८ धावांत कोलमडला. विकेटकिपर ऋषभ पंतच्या नाबाद शतकी खेळीचा अपवाद वगळला तर एकाही खेळाडूने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही. पुजारा-रहाणे सारख्या खेळाडूंचं अपयश आणि अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी भारताला चांगलीच भोवली.
ADVERTISEMENT
दुसऱ्या दिवसाअखेरीस दोन्ही सलामीवीर गमावलेल्या भारतीय संघाने नंतरच्या षटकांत आपला डाव सावरत ७० धावांची आघाडी घेतली होती. तिसऱ्या दिवशी भारताला आपल्या या आघाडीत मोठी भर घालण्याची चांगली संधी होती. परंतू अनुभवी पुजारा जेन्सनच्या गोलंदाजीवर पहिल्याच ओव्हरमध्ये माघारी परतला. पुजाराला बाऊन्सर बॉल खेळण्यास भाग पाडून फाईन लेगला उभ्या केलेल्या पिटरसनच्या हातात कॅच द्यायला जेन्सनने भाग पाडलं.
या धक्क्यातून टीम इंडिया सावरते न सावरते तोच अजिंक्य रहाणेही माघारी परतला. कगिसो रबाडाने त्याला अवघ्या एका धावेवर आऊट केलं. यानंतर ऋषभ पंत आणि विराट कोहलीने मैदानावर स्थिरावत भारताचा डाव सावरला. ४ बाद ५८ वरुन दोघांनीही पाचव्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी पहिलं सत्र सावधतेने खेळून काढलं. ज्यात ऋषभ पंतने काही आक्रमक फटके खेळले तर विराट कोहलीने एक बाजू लावून धरली.
परंतू दुसऱ्या सत्रानंतर भारतीय डावाला गळती लागली. सर्वात आधी एन्गिडीने कर्णधार विराट कोहलीला माघारी धाडत भारताला मोठा धक्का दिला. कोहलीने १४३ बॉलमध्ये २९ धावा केल्या. यानंतर तळातल्या फलंदाजांनी पुन्हा एकदा निराशा केली. रविचंद्रन आश्विन, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी यांनी अक्षरशः हाराकिरी करत आपल्या विकेट फेकल्या.
ऋषभ पंतने अखेरीस जसप्रीत बुमराहच्या साथीने आपलं शतक पूर्ण करत कसोटी कारकिर्दीतलं चौथं शतक झळकावलं. परंतू जेन्सनच्या बॉलिंगवर दोन धावा काढण्याचा बुमराहचा निर्णय फसला आणि त्याच्या पुढच्याच चेंडूवर त्याने आपली विकेट फेकली. आफ्रिकेकडून जेन्सनने ४ तर रबाडा आणि एन्गिडीने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या. त्यामुळे आफ्रिकेचे फलंदाज हे आव्हान कसं पूर्ण करतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT